|| श्रीगणेशाय नम: ||
|| श्रीदत्तात्रय मानसपूजा ||
|| श्रीगुरूभ्योनम: ||
प्रथम होवोनि सुस्नान || मग करूनियां पवित्र ||
आसनीं बैसावें स्वस्थचित्त || श्रीगुरूमानसपुजेसी || १ ||
सिद्ध आसनारूढ ध्यानीं || खेचरी मुद्रा धारणीं ||
तूंचि तारक आम्हां लागुन || हरि स्वरूपी दत्तगुरू || २ ||
मानसपूजे कारणें || परिवारासह तुम्ही येणें ||
उतावीळ मी दर्शनाकारणें || ऐसी प्रार्थना करावी || ३ ||
सुवर्णयुक्त रत्नजडित || देवतामय सुंदर खचित ||
सिंहासन मी कल्पिलें येथ || बैसावें जी सदगुरू मूर्ती || ४ ||
कर्पुर चंदन मिश्रित तेलें || पादप्रक्षालना जल कल्पिलें ||
स्वीकार कराहो येवेळें || तव चरण प्रक्षाळितों || ५ ||
गंध तुलसी बिल्वपत्र || उदक अक्षता शमी पवित्र ||
यांनी भरलें हें सुवर्णपात्र || सुवास तयांचा घ्याहो स्वामी || ६ ||
सुवासिक जल मनांत आणिलें || सुवर्णपात्रीं मग तें भरलें ||
भक्तीनें तुम्हां अर्पण केलें || आचमन मधुपर्क दिगंबरा || ७ ||
सुगंधीत सुंदर तेलें || स्नानालागीं मी कल्पियलें ||
पंचामृतें गंगोदकें न्हाणिलें || स्वीकारावी देवराया || ८ ||
दिगंबराहो आचांत्यजलें || भक्तीनें तुम्हां अभिषेकिलें ||
भगवें वस्त्र मृगचर्म अर्पिलें || स्वीकार करा हीच प्रार्थना || ९ ||
बहू सूत्रांनीं असे युक्त || ऐसें हें ब्रम्हसूत्र ||
म्हणूनी देवतामय सूत्र || धारण करा गुरूवर्या || १० ||
भस्म कस्तुरी आणि केशर || चंदनयुक्त परिकर ||
रत्नाक्षता असती तयार || अलंकृत तुम्हां करितसें || ११ ||
तुळसी गंध शमि बिल्वपत्र || सुवासिक नानापुष्पें येथ ||
मनांत कल्पिली म्यां बहूत || अर्पिली तीं सदगुरूचरणीं || १२ ||
लाक्षासिता अभ्रक श्रीवास || श्रीखण्ड अगरू गुग्गुलयुक्त ||
खास अग्नींत धूपास || घातलासे यतिराया || १३ ||
सुवर्णपात्र मी कल्पिलें || तयामध्यें दीप लाविले ||
कर्पूरयुक्त प्रज्वाळिलें || स्वीकाराहो दत्तप्रभू || १४ ||
षडरसाचें पक्वान्न परिकर || गोरसयुक्त मिष्टान्न साचार ||
सुवर्णपात्रीं ठेंविलें सत्वर || भक्षण जलपान करावें || १५ ||
हस्तमुख प्रक्षालून || सवेंचि आचमन करून ||
तांबुल दक्षिणादि फलेन || संतुष्ट व्हावें स्वामिया || १६ ||
रत्नदीपांची आरती लावून || आणि आपणा नमस्कार करून ||
करितों तवगुण वर्णन || प्रदक्षिणा सहित पैं || १७ ||
दिगंबराहो तव मस्तकीं || अर्पिली मंत्रपुष्पांजली कीं ||
गायन वादन नर्तनादि || उपचार षोडश अर्पिले || १८ ||
तव प्रेरणेनें प्रेरित || आज्ञान पामर मी खचित ||
पूजा केलीहो त्वरित || प्रेरक तुम्ही संतुष्ट व्हावें || १९ ||
मग घालोनि प्रदक्षिणा || करितों सांष्टांग नमन ||
करद्वय जोडोनि जाणा || तव प्रार्थना करीतसें || २० ||
जयजयाजी दिंगंबरा || जयजयाजी अत्रीकुमरा ||
ब्रम्हा विष्णू महेश्र्वरा || सांभाळावें बाळकासी || २१ ||
तूं दीनांचा कैवारी || अवतरलासी अनुसूयोदरीं ||
तुझी भक्ती जो निरंतरी || प्रतिपाळसी वरदहस्तें || २२ ||
ऐसी प्रार्थना करून || मागतसे तुजलागून ||
या मानसपूजेचे पठण || करितां दु:खें हरवी || २३ ||
भक्तांची व्हावी कामना पूर्ण || पिशाच्चादि बाधा निरसन ||
अनेक संकटांपासून || मुक्त व्हावें भक्तानें || २४ ||
येणेंपरी मागतां वर || प्रसन्न झाला यतिवर ||
जे भक्तिभावें पठण करील नर || संकटें त्याचीं दूर पळती || २५ ||
विश्र्वास धरील जो मानसीं || त्यासी कृपा करील औदुंबरवासी ||
न म्हणा हो असत्य यासीं || अनुभवें कळों येईल || २६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे दत्तदास विरचित || दत्तात्रय मानसपूजास्तोत्रं संपूर्ण ||
|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||
|| समाप्त ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें