|| श्रीगणेशाय नम: ||
|| मानस पूजा स्वामी समर्थाची ||
नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||
पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षदा लावू मोती ||
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा
प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||
दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||
वीणा तुतार्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती
म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता
अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||
सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
गंधाक्षदा वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||
चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||
पुष्पाजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४
हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति ||
करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||
पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षणा मी तुम्हां काय देऊ ||
नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||
हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||
मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||
|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें