मंगलवार, 28 जुलाई 2009

गुरुचरित्र -द्वादशोऽध्यायः

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ 
श्रीगुरुभ्यो नमः ॥श्रीगुरू म्हणती जननीसी ।
 आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी ।
 काय भरंवसा जीवित्वाचा ॥१॥श्लोक ॥
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः ।
नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥२॥टीका ॥
 एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी ।
अनित्य देह विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥३॥
देह
म्हणिजे क्षणभंगुर । नाहीं राहिले कवण स्थिर ।
जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गे रहाटावें ॥४॥जो असेल मृत्यूसी जिंकीत ।
त्याणें निश्चयावें शरीर नित्य । त्यासि तुझा उपदेश सत्य ।
म्हणे करीन धर्म पुढें ॥५॥अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें ।
करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥६॥अल्पोदकीं जैसा मत्स्य ।
तैसें मनुष्य अल्पायुष्य । जंववरी असे प्राणी सुरस । धर्म करावा परियेसा ॥७॥
जैसा
सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें । बावीस सहस्त्र गांव पळे ।
तैसें
आयुष्य क्षीण होय ॥८॥पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं ।
 स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥९॥तैसें शरीर नव्हे स्थिर ।
जीवित्वा मरण निर्धार । यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हें नश्य जाणा ॥१०॥
याचि
कारणें देहासी । विश्वासूं नये परियेसीं । मृत्यु असे हा सहवासी ।
धर्म करावा तात्काळीं ॥११॥पिकलें पान वृक्षीं जैसें । लागलें असें सूक्ष्मवेशें ।
 तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥१२॥एखादा नर कळंतरासी ।
 द्रव्य देतो परियेसी । दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥१३॥
जैशा
समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका । परतोनि न येती जन्मभूमिका ।
 तैसें आयुष्‍य न परते ॥१४॥अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्चयें जाणोन ।
पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥१५॥जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं ।
वृथा गेला दिवस पाहीं । तया यमासि करुणा नाहीं । करावें पुण्य तात्काळ ॥१६॥
पुत्र
दारा धन गोधन । आयुष्‍य देह येणें-गुण । जे जन निश्चित म्हणती जाण ।
 ते पशूसम परियेसीं ॥१७॥जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं ।
तैसें
या शरीरासी । वृद्धाप्य भक्षी अवधारा ॥१८॥याकारणें तारुण्यपणीं ।
 करावें पुण्य विद्वज्जनीं । आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥१९॥
जो
यमाचा असेल इष्‍ट । त्याणें करावा आळस हट्ट । अमरत्वें असेल जो सुभट ।
 त्याणें पुढें धर्म करावा ॥२०॥संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्‍प असे मोगरी ।
 सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥२१॥जैसी विजू असे लवत ।
 सवेंचि होय अव्यक्त । तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥२२॥ऐसें नानापरी देखा ।
 बोधिता झाला जननीजनकां । विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्त्व सांगतो ॥२३॥
ऐकोनि
पुत्राचें वचन । माता करीतसे नमन । देवा निरोपिलें ज्ञान ।
विनंति
माझी परिसावी ॥२४॥तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी ।
विश्वास
नव्हे गा मानसीं । कुळदेवता पुत्रराया ॥२५॥जंववरी होय एक सुत ।
तंववरी रहावें समीपत । निरोप नेदीं तंववरी सत्य ।
म्हणोनि
विनवी तयेवेळीं ॥२६॥माझें वचन अव्हेरुनि ।
जरी
जाशील निघोनि । प्राण देईन तत्क्षणीं ।
हा निश्चय अवधारीं ॥२७॥पुत्र नव्हसी तूं आम्हांसी ।
आमुचें
कुळदैवत होसी । सत्य करीं गा वचनासी ।
बोल आपुले दातारा ॥२८॥ऐकोनि मातेचें वचन ।
श्रीगुरू बोलती हांसोन । आमचे बोल सत्य जाण ।
तुझें वाक्य निर्धारीन पां ॥२९॥तुतें होतांचि पुत्र दोनी ।
 निरोप द्यावा संतोषोनि । मग न राहें ऐक जननी ।
बोल आपुले सत्य करीं ॥३०॥संवत्सर एक तुझ्या घरीं ।
राहूं माते निर्धारीं । वासना पुरतील तुझ्या जरी ।
मग निरोप दे मज ॥३१॥ऐसी करुनियां निगुती ।
 राहिले श्रीगुरु अतिप्रीतीं । वेदाभ्यास शिकविती ।
शिष्यवर्गा बहुतांसी ॥३२॥नगरलोक विस्मय करिती ।
 अभिनव झालें ऐसें म्हणती । बाळ पहा हो वर्षे साती ।
 वेद चारी सांगतसे ॥३३॥विद्वानांहूनि विद्वान विद्यार्थी ।
तीनी वेद पढती । षट्‌शास्‍त्री जे म्हणविती ।
तेही येती शिकावया ॥३४॥येणेंपरी तया घरीं ।
 राहिले गुरु प्रीतिकरीं । माता झाली गरोदरी ।
महानंद करीतसे ॥३५॥नित्य पूजिती पुत्रासी ।
भाव कुळदैवत ऐसी । निधान लाधे एखाद्यासी ।
 काय सांगों संतोष त्यांचा ॥३६॥तंव नवमास जाहली अंतर्वत्‍नी ।
माता झाली प्रसूती । पुत्र झाले युग्‍म ख्याती ।
 अतिसुंदर परियेसा ॥३७॥पुत्र झाले उल्हास थोर ।
मातापित्या संतोष फार । आशीर्वचन असे गुरू ।
असत्य
केवीं होईल ॥३८॥याकारणें गुरुवचन ।
 सत्य मानावें विद्वज्जनें । जैसें असेल अंतःकरण ।
 तैसें होईल परियेसा ॥३९॥ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक ।
खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरू तयांजवळी ॥४०॥जननी ऐक माझे वचना ।
झाली तुझी मनकामना । दोघे पुत्रनिधाना ।
 पूर्णायुषी आहेति जाण ॥४१॥आणखी होतील दोघे कुमारक ।
त्यानंतर कन्या एक । असाल नांदत अत्यंत सुख ।
 वासना पुरतील तुझी जाणा ॥४२॥आतां आमुतें निरोपावें ।
जाऊं आम्ही स्वभावें । संतोषरुपी तुम्हीं व्हावें ।
म्हणोनि निरोप घेती तयेवेळीं ॥४३॥संतोषोनि मातापिता ।
चरणांवरी ठेविती माथा । स्वामी आमुच्या कुळदेवता ।
अशक्‍य आम्ही बोलावया ॥४४॥न कळे आम्हां स्वरुपज्ञान ।
तुझें
स्वरुप नकळे कवणा । मायामोहें वेष्‍टोन कामना ।
नेणोंचि
महिमान तुझें ॥४५॥मायाप्रपंचें वेष्‍टोनि ।
तुतें जरी सुत म्हणोनि । एके समयीं निष्‍ठुर बोलों वचनीं ।
क्षमा करणें स्वामिया ॥४६॥सहभोजन-शयनासनीं ।
 तुतें गांजों भुकेजोनि । कडे न घेंचि उबगोनि ।
 क्षमा करीं गा देवराया ॥४७॥तारक आमुचे वंशासी ।
बापा
तूं अवतरलासी । प्रदोषपूजा फळासी ।
आली मातें स्वामिया ॥४८॥आतां आम्हां काय गति ।
 सांगा स्वामी कृपामूर्ती । जननमरण यातनयाती ।
कडे करावें दातारा ॥४९॥सगरांवरी जैसी गंगा ।
 तैसा तुवां आलासि चांगा । पावन केलेंसि माझे अंगा ।
 उभयकुळें बेचाळीस ॥५०॥आम्हां ठेविसी कवणेपरी ।
या धुरंधर संसारीं । तुझें दर्शन नोहे तरी ।
केवीं वांचों प्राणात्मजा ॥५१॥ऐकोनि मातापितयांचें वचन ।
 बोलती श्रीगुरू आपण । जे जे समयीं तुमचें मन ।
 स्मरण करील आम्हांसी ॥५२॥स्मरण करितां तुम्हांजवळी ।
 असेन जननी मी तात्काळीं । न करावी चिंता वेळोवेळीं ।
 म्हणोन भाक देतसे ॥५३॥आणिक कन्या पुत्र तीनी ।
 होतील ऐक तूं भवानी । दैन्य नाहीं तुमच्या भुवनीं ।
 सदा श्रीमंत नांदाल ॥५४॥जन्मांतरीं परमेश्वरासी ।
पूजा
केली तुवां प्रदोषीं । याची महिमा आहे ऐसी ।
 जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥५५॥इह सौख्य होय ऐक ।
 देहांतीं जाणा परम लोक । पूजा करितां पिनाक ।
पुनर्जन्म तुम्हां नाहीं ॥५६॥तुवां आराधिला शंकर ।
 आम्हां करविला अवतार । वासना पुरेल तुझा भार ।
 आम्हां निरोप दे आतां ॥५७॥पुनर्दर्शन तुम्हांसी ।
 होईल ऐका वर्षे-तीसीं । जावोनि बदरीवनासी ।
म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥निरोप घेवोनि तये वेळां ।
 श्रीगुरू निघाले अवलीळा । नगरलोक येती सकळा ।
 मातापिता बोळविती ॥५९॥म्हणती समस्त नगरनारी ।
तपासी निघाला ब्रह्मचारी । होईल पुरुष अवतारी ।
मनुष्यदेही दिसतसे ॥६०॥एक म्हणती पहा हो नवल ।
 तपासी निघाला असे बाळ । मातापिता सुखें केवळ ।
 निरोप देती कौतुकें ॥६१॥कैसें यांचें अंतःकरण ।
 जैसा हो कां पाषाण । मन करुनि निर्वाण ।
 बोळविताति पुत्रासी ॥६२॥एक म्हणती नव्हे बाळ ।
होईल त्रिमूर्तीचा अवतार केवळ । अनुमान नव्हे हा निश्चळ ।
वेद केवीं म्हणतसे ॥६३॥सात वर्षांचें बाळक देखा ।
वेद म्हणतो अखिल शाखा । मनुष्यमात्र नव्हे ऐका ।
 ऐसें म्हणती साधुजन ॥६४॥ऐसें म्हणोनि साधुजन ।
करिताति साष्‍टांगीं नमन । नानापरी स्तोत्रवचन ।
 करिते झाले अवधारा ॥६५॥नमन करोनि सकळिक ।
आले
आपुले गृहांतिक । पुढें जाती जननीजनक ।
 पुत्रासवें बोळवीत ॥६६॥निजस्वरुप जननियेसी ।
 दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-द्त्तात्रेयासी ।
 देखते झाले जनकजननी ॥६७॥त्रयमूर्तीचा अवतार ।
झाला
नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर ।
पाहतां
नमिलें चरणासी ॥६८॥जय जया जगद्गुरु ।
 त्रयमूर्तीचा अवतारु । आमुचें पुण्य होतें थोरू ।
म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥६९॥तू तारक विश्वासी ।
आम्हां उद्धरिलें विशेषीं । पुनर्दर्शन आम्हांसी ।
द्यावें म्हणोनि विनविती ॥७०॥ऐसें म्हणोनि मातापिता ।
चरणांवरी ठेविती माथा । अलिंगिती श्रीगुरुनाथा ।
 स्नेहभावेंकरुनियां ॥७१॥संतोषोनि श्रीगुरुमूर्ति ।
आश्वास केला अतिप्रीतीं । पुनर्दर्शन हो निश्चितीं ।
देईन म्हणती तये वेळीं ॥७२॥ऐसें तयां संभाषोनि ।
निरोप घेतला तत्क्षणीं । परतोनि आली जनकजननी ।
 येती संतोषोनि मंदिरांत ॥७३॥वरदमूर्ति श्रीगुरुराणा ।
 निघाला जावया बदरीवना । पातला आनंदकानना ।
 वाराणसी क्षेत्रासी ॥७४॥अविमुक्त वाराणसी पुरी ।
 क्षेत्र थोर सचराचरीं । विश्वेश्वर अवधारीं ।
 अनुपम्य असे त्रिभुवनीं ॥७५॥राहूनियां तया स्थानीं ।
 अनुष्‍ठिती गुरुशिरोमणी । विश्वेश्वराचे दर्शनीं ।
पूजा करिती आत्मारामासी ॥७६॥येणेंपरी तया स्थानीं ।
 क्वचित्काळ श्रीगुरुमुनि । अष्‍टांगयोगेंकरुनि ।
तप करिती परियेसा ॥७७॥तया काशीनगरांत ।
तापसी असती आणिक बहुत । संन्यासी यती अवधूत ।
 तप करिती दारुण ॥७८॥तयांत श्रीगुरू ब्रह्मचारी ।
योगाभ्यासधुरंधरीं । करिताति ; तपस्वी येरी ।
अभिनव करिती मनांत ॥७९॥म्हणती पहा हो ब्रह्मचारी ।
 तप करितो नानापरी; कैसें वैराग्य याचे उदरीं ।
 निर्लिप्‍त असे परियेसा ॥८०॥शरीरस्वार्थ नाहीं यासी ।
योग्य
होय हा संन्यासीं । स्नान करितो त्रिकाळेसीं ।
 मणिकर्णिका तीर्थांत ॥८१॥ऐसें स्तोत्र नित्य करिती ।
 समस्त संन्यासी येती । वृध्द होता एक यति ।
'कृष्णसरस्वती' नामें ॥८२॥तो केवळ ब्रह्मज्ञानी ।
तपस्वी असे महामुनि । सदा देखोनियां नयनीं ।
 स्नेहभावें भावीतसे ॥८३॥म्हणे समस्त यतीश्वरांसी ।
 न म्हणा नर ब्रह्मचारीसी । अवतारपुरुष अतितापसी ।
 विश्ववंद्य दिसतसे ॥८४॥वयसा धाकुटा म्हणोनि ।
नमन न कराल तुम्ही मुनी । प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं ।
 आम्हां वंद्य असे देखा ॥८५॥वार्धक्यपणें आम्ही यासी ।
वंदितां दुःख सकळांसी । विशेष आम्ही संन्यासी ।
 मूर्ख लोक निंदिती ॥८६॥याकारणें आम्ही यासी ।
विनवूं, परोपकारासी । संन्यास देता, समस्तांसी ।
 भक्ति होईल स्थिर मनीं ॥८७॥लोकानुग्रहानिमित्त ।
 हा होय गुरु समर्थ । याचे दर्शनमात्रें पुनीत ।
आम्ही परियेसा ॥८८॥याकारणें बाळकासी ।
 विनवूं आम्ही विनयेसीं । आश्रम घ्यावा संन्यासी ।
पूजा करुं एकभावें ॥८९॥म्हणोनि आले तया जवळीं ।
 विनविताति मुनी सकळी । ऐक तापसी स्तोममौळी ।
 विनंति असे परियेसा ॥९०॥लोकानुग्रहाकारणें ।
 तुम्हीं आतां संन्यास घेणें । आम्हां समस्तां उद्धरणें ।
 पूजा घेणें आम्हां करवीं ॥९१॥या कलियुगीं संन्यास म्हणोन ।
 निंदा करिती सकळै जन । स्थापना करणार कवण ।
न दिसती भूमीवरी ॥९२॥श्लोक ॥ यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृकम्‌ ।
देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत्‌ ॥९३॥टीका ॥
यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेतां अतिदूषण ।
पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥९४॥करितां कलियुगांत ।
 निषिद्ध बोलती जन समस्त । संन्यासमार्ग सिद्धांत ।
वेदसंमत विख्यात ॥९५॥पूर्वी ऐसें वर्तमानीं । निषेध केला सकळही जनीं ।
 श्रीशंकराचार्य अवतारोनि । स्थापना केली परियेसा ॥९६॥
तयावरी
इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास ।
कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताती ॥९७॥
आश्रमाचा
उद्धार । सकळ जनां उपकार । करावा कृपासागर ।
म्हणती
सकळ मुनिजन ॥९८॥ऐकोनि त्यांची विनंति ।
 श्रीगुरुमुनि आश्रय घेती । वृद्ध कृष्णसरस्वती ।
तयापासूनि परियेसा ॥९९॥ऐसें म्हणतां सिद्धमुनि ।
विनवीतसे नामकरणी । संदेह होतो माझे मनीं ।
कृपानिधि
मुनिराया ॥१००॥म्हणती श्रीगुरू तोचि जगद्गुरू ।
त्यातें झाला आणिक गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु ।
कवणेपरी दिसतसे ॥१॥सिद्ध म्हणे शिष्यासी ।
सांगेन याची स्थिति कैसी । पूर्वी श्रीरघुनाथासी ।
झाला वसिष्‍ठ केवीं गुरु ॥२॥आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी ।
 सांदीपनी जाहला गुरु कैसी । अवतार होतांचि मानुषीं तयापरी रहाटावें ॥३॥
याकारणें
श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती । बहुकाळींचा होता यति ।
म्हणोनि त्यातें मानिलें ॥४॥शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी ।
वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥५॥समस्त यतीश्वरांहून ।
 तयासि दिधला बहुमान । कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण ।
 कोण गुरुचें मूळपीठ ॥६॥विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं ।
 त्याणें माझे मानसीं । संतोष होईल स्वामिया ॥७॥ऐसें शिष्य विनवितां ।
 तंव सांगे विस्तारता । मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥८॥
आदिपीठ
'शंकर' गुरु । तदनंतर 'विष्णु' गुरु । त्यानंतर 'चतुर्वक्‍त्र' गुरु ।
 हें मूळपीठ अवधारीं ॥९॥तदनंतर 'वसिष्‍ठ' गुरु । तेथोनि 'शक्ति', 'पराशरु' ।
 त्याचा शिष्य 'व्यास' थोरु । जो कां अवतार विष्णूचा ॥११०॥तयापासूनि 'शुक' गुरु जाण ।
'गौडपादाचार्य' सगुण । आचार्य 'गोविंद' तयाहून । पुढें आचार्य तो 'शंकर' जाहला ॥११॥
तदनंतर
'विश्वरुपाचार्य' । पुढें 'ज्ञानबोधीगिरिय' । त्याचा शिष्य 'सिंहगिरिय' ।
 'ईश्वरतीर्थ' पुढें झाले ॥१२॥तदनंतर 'नृसिंहतीर्थ' । पुढें शिष्य 'विद्यातीर्थ' ।
 'शिवतीर्थ', 'भारतीतीर्थ' । गुरुसंतति अवधारीं ॥१३॥मग तयापासोनि ।
 'विद्यारण्य' श्रीपादमुनि । 'विद्यातीर्थ' म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥१४॥
त्याचा
शिष्य 'मळियानंद' । 'देवतीर्थसरस्वती' वृंद । तेथोनि 'सरस्वतीयादवेंद्र' । गुरुपीठ येणेंपरी ॥१५॥यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि 'कृष्णसरस्वती' विशेष । बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥१६॥येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ । संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥१७॥समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ । म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥१८॥ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं । यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥१९॥मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि । उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थे पहावया ॥१२०॥सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी । सांगतां विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥२१॥समस्त तीर्थे अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित । भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥२२॥सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां । विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावन्मात्र सांगतों परियेसीं ॥२३॥समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसीं ॥२४॥गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव । प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥२५॥तया स्थानीं असतां गुरू । आला एक द्विजवरु । 'माधव' नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥२६॥ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं । चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥२७॥नाम 'माधवसरस्वती' । तया शिष्यातें ठेविती । तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥२८॥सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणीं । अखिल यतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥२९॥गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥१३०॥इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपरा-कथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥

 



--
Ravindra S. Dhurandhar
Ph No.9324107806
http://gorakhmantras-ravidhurandhar.blogspot.com/