बुधवार, 6 अप्रैल 2016

कानिफनाथा मी पाहीले- प.पू.देवेंद्रनाथ

कानिफनाथा मी पाहीले
समाधीतुनी समीप आले !! धृ !!

जटा मोकळी दाढी छोटी
मोहक डोळे सतेज दृष्टी
प्रसन्न मुद्रा सुवर्ण कांती
किशोर यौवन असे पाहीले !! १ !!

हाती कटोरा झोळी खांदी
त्रिशूळ घेउनी उभे राहती
भगवी कफनी भस्म कपाळी
रुद्र माळा गंध हि दिसले !! २ !!

कन्थ्या पुंगी शंख निश्रुंगी
पायी खडावा दवणा अंगी
कडे पाहीले एका पायी
अश्वही उमदा म्या पाहीले !! ३ !!

माथी फेटा जव मेवाडी
तव नाथांच्या अंगी मोती
गंभीर मुद्रा अश्वावरती
दीन दयाळू योगी बनले !! ४ !!

हसती बोलती बेटा मजला
जवळ बसवूनी सनाथ केला
चराचरी मज ब्रह्म भासला
वाळुनी काय भान हरपले !! ५ !!

नाथांचा मी दासही झालो
गुरुकृपे अमृत प्यालो
राघव कृपे देवेंद्र झालो
गुरुनाथांसी म्या पाहीले !! ६ !!


प.पू.देवेंद्रनाथ

जती - निरंजन-प.पू.देवेंद्रनाथ ( Devendranath Madhi)

कानिफ कानिफ जती निरंजन
सदा वदे जे “अलख निरंजन” !! धृ !!

गज कर्णातुनी भूवर आले
कान्हुपाद हे सनाथ झाले
जती जालिंदर गुरु मिळाले
जती नारायण “अलख निरंजन”!! १!!

ध्यान समाधी, तप आचरले
विचार सारे दंडही झाले
कन्थ्या अंगी धैर्य नेसले
ब्रह्मरूप हे “अलख निरंजन”!! २ !!

शांती जवळी स्मशान रुपी
खेचरी मुद्रा नाथा आजपी
योग उन्मनी मठ एकांती
सदानंद हे “अलख निरंजन”!! ३ !!

गुरुपादुका भाव हा कृपा
निरालंब हे पीठ जे जपा
नाद अनाहत अलक्ष अजपा
गोत्र निरंजन “अलख निरंजन”!! ४ !!

कापालिक जो भाषा अकुली
शून्य ध्यान जे अवधूत बोली
ज्ञानयोग तो देवेंद्र कायी
सदा निरंजन “अलख निरंजन”!! ५ !!


प.पू.देवेंद्रनाथ

गुरुभाक्तीचे मोल-प.पू.देवेंद्रनाथ ( Devendranath Madhi)

गुरुभाक्तीचे मोल

नको बोलू नाही नाही
गुरूदेवांची इच्छा राही !! धृ !!

नाथ पंथी मी बालक त्यांचा
सेवक झालो गुरु निष्ठेचा
इच्छा त्यांची भाव भक्तीचा
गोरख माई देईल काही !!१!!

भूक ना मला ह्या पोटाला
भूक भक्तीची ह्या जीवाला
देह वाहिला गुरु भक्तीला
गोरख माई खोटा नाही !!२!!

काय हवे ते मागून घेई
वडा देवूनी कर उतराई
माई माझा डोळा घेई
गुरु भक्तीला मोलही नाही !!३!!

नको बोलू नाही नाही
गुरूदेवांची इच्छा राही !! धृ !!

प.पू.देवेंद्रनाथ