|| श्रीगणेशाय नम: ||
|| श्रीदत्तात्रयाची मानसपूजा ३री ||
प्रथम गणेश पूजन || सरस्वतीतें वंदन ||
सदगुरूंसी करूनी आवाहन || हृदय चौरंगी बैसविलें || १ ||
भाव हेंची पाद्य आचमन || चरण प्रक्षाळणकरून ||
तीर्थ मस्तकीं वंदून || मार्जन करूनी शुद्ध व्हावें || २ ||
पंच तत्वांचें पंचामृत || शांति गंगोदक निर्मळ बहुत ||
वाणीनें न बोलावें अनृत || हेंची दिगंबरा आवडतें || ३ ||
वैराग्य रंग भगवी छाटी || स्मरण रूद्राक्ष माला कंठीं ||
शंख चक्र त्रिशूल मुष्टी || अत्री पुत्र शोभतो || ४ ||
पाठीसी उभी गायित्री माता || श्र्वानरूपी वेद तत्वता ||
अनसूयेची अगाधता || त्रैमूर्ती बाळें खेळविलें || ५ ||
प्रेम आरक्त केशरी गंध || सुमन हाराचा सुटला सुगंध ||
तुळस गांठी चरणारविंद || श्रीपाद वल्लभ पूजियेले || ६ ||
समतेचा मांडिला पाट || त्यावरी श्रद्धेचें ताट ||
सगुण चित्रें रांगोळी उत्कृष्ट || भोजनास बैसले यतिराज || ७ ||
वाढिलें ज्ञानामृत अन्न || मायेची शाखा पव्कान्न ||
अनुभवानंद जलपान || जगदगुरू संतोषले || ८ ||
भजनाचे विडे रंगले || चित्त दक्षिणेस दिलें ||
प्रारब्ध कर्पूरा जाळिलें नरहरी आनंदती || ९ ||
जागृती स्वप्न सुषुप्ती || प्रदक्षिणा ओलांदती ||
गुरू तये स्थळीं राहती || नमन केलें साष्टांगीं || १० ||
आतां मंत्रपुष्प राहिलें || देह चरणासी वाहिलें ||
कृष्ण सेविका नाम उरलें || पुसून जाईल कालांतरीं || ११ ||
मानस पूजा कृष्णें रचिली || हृदयांतरीं राहतो जवळी ||
तो मी तो मी ऐसे बोली || लक्ष असावें सर्वदा || १२ ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें