श्रीगणेशाय नमः
जयजयाजी जगदुद्धारा ॥ अखिल निरंजना निर्विकारा ॥ भक्तमानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबुधारा ओसरसी ॥१॥
तरी तूं असतां कृपाळु आई ॥ माय माझे विठाबाई ॥ तरी आतां ग्रंथप्रवाहीं ॥ येऊनियां बैसे गे ॥२॥
मागिले अध्यायीं प्रेमेंकरुन ॥ वैभवीं मेळविला राव विक्रम ॥ भर्तरीसंगमीं पिंगलालग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥३॥
उपरी मृगया करुनी ॥ अवंतिकास्थाना जाऊनि ॥ राजधामीं कनकासनीं ॥ सभामंडपीं बैसला ॥४॥
क्षणैक बैसूनि त्वरितात्वरित ॥ पाकशाळे गेला नृपनाथ ॥ पक्कान्न सेवूनि अंतापुरात ॥ पिंगलागृहीं संचरला ॥५॥
कनकमंचकीं सुमनशेजी ॥ राव बैसवी पिंगला अजीं ॥ षोडशोपचारेंकरुनि पूजी ॥ श्रद्धापूर्वक पिंगला ॥६॥
परम प्रीतीं भावारुढ ॥ रायें दर्शविलें चित्तीं कोड ॥ मग करी कवळूनि स्नेहपाडें ॥ निकट घेत पिंगला ॥७॥
तीतें वामांकी बैसवोन ॥ परम प्रीतीनें घेत चुंबन ॥ वाचेनें म्हणे तुजसमान ॥ अन्य दारा नावडती ॥८॥
अगे पिंगले माझें मन ॥ भावी मम देहींचें ऐक्यरत्न ॥ जैसे मित्र आणि रश्मिचिन्ह ॥ ऐक्यदेहीं मिरवती ॥९॥
कीं राजमौळी तेजें आगळा ॥ द्वितीये शोभली त्याची कळा ॥ तेवीं माते तूं पिंगला ॥ मम चित्तावरी धांवें ॥१०॥
अगे हे पिंगले माझा भाव ॥ पिंगलाभर्तरीं ऐक्यनांव ॥ एकाचि देहीं मज वाढीव ॥ भासे भास शुभानने ॥११॥
जैशी शर्करा आणि गोडी ॥ नामें भिन्न परी ऐक्यप्रौढी ॥ तेवी तूं पिंगला माझे पाठीं ॥ भासे भास शुभानने ॥१२॥
जैसा उदधी आणि लहरी ॥ परी ऐक्यता सागरीं ॥ तेवीं मातें तूं सुंदरी ॥ भास भाससी शुभानने ॥१३॥
ऐसें म्हणूनि परम प्रीतीं ॥ पुन्हां चुंबन घेत नृपती ॥ मग भोगूनि सकाम रीतीं ॥ संतुष्ट चित्तीं मिरवला ॥१४॥
मग विचार सुचला एक गहन ॥ आनंदें बैसती प्रीतीकरुन ॥ बैसल्या पिंगला बोलूनि वचन ॥ विडा त्रयोदशगुणी देतसे ॥१५॥
म्हणे हे महाराजा नृपवरा ॥ मम देहींचे प्राणप्रियेश्वरा ॥ मम मानसचकोरचंद्रा ॥ प्रेमांबु मिरवतसे ॥१६॥
तरी तुम्हां आम्हां गांठी ॥ गांठी गांठिल्या त्या परमेष्ठीं ॥ गांठिल्या परी चित्तदेठीं ॥ ऐक्यभास भासतसे ॥१७॥
जसें लवण उदकी मिश्रित ॥ भिन्न न दावी दृष्टींत ॥ तन्न्यायें ऐक्यचित्त ॥ रावणराणी शोभत ॥१८॥
तरी ऐसा मिश्रित अर्थ ॥ उदया पावला असे ऐक्यचित्त ॥ परी नेणूनि निर्दय परम कृतांत ॥ जगामाजी मिरवतसे ॥१९॥
चित्तीं चित्तभय काया ॥ हरण करीत असे राया ॥ तरी नेणों आपण विषयचिंते या ॥ बुद्धि जरी संचरली ॥२०॥
संचरतां परी एक त्यांतें मातें दिसत उचितार्थ ॥ तुम्हांआधी मातें मृत्यु ॥ सुगम चित्ता वाटतसे ॥२१॥
तरी हें ऐसें इच्छिल्याप्रमाण ॥ ईश्वरसत्ते जरी आलें घडोन ॥ मग परम बरवें दैववान ॥ जगीं असें मी एक ॥२२॥
ऐसें बोलतां शुभाननी ॥ राव ऐकूनि बोले वाणी ॥ नेणों सखे ईश्वरकरणी ॥ पुढील काहीं वदवेना ॥२३॥
मज आधी तूं कामिनी ॥ मृत्यु पावों इच्छिसी मनीं ॥ परंतु नेणों निर्दयपणीं ॥ मित्रात्मज मिरवतसे ॥२४॥
तो कदा न जाणे वेदविधी ॥ सदा वर्ततसे बिघडबुद्धीं ॥ नेणों मज मृत्यु तुज आधी ॥ आल्या काय करशील ॥२५॥
ऐसें ऐकूनि वदे पिंगला ॥ नेणो कैसे असे जी भाळा ॥ रेखिली विधीनें अकळ कळा ॥ कळत नाहीं महाराजा ॥२६॥
परी ऐशा घडल्या गोष्टी ॥ मी राहाणार नाहीं महीपाठीं ॥ देह दाहूनिया हव्यवाटी ॥ गमन करीन तुम्हांसह ॥२७॥
राव ऐकूनि बोले वचन ॥ पुरे आतां तुझे बोलणे ॥ प्राणांहूनि प्रिय कोण ॥ घात त्याचा करवेना ॥२८॥
तरी हे बोल उगलेचि फोल ॥ माझिया तोषाचें करिसी मोल ॥ परी समय येतां तव पाऊल ॥ मागेंचि धांव घेणार ॥२९॥
तरी अनुभव माझिये चित्ता ॥ सहज आहे मजला पाहतां ॥ अगे राज्यासनीं विपुल वार्ता ॥ सेवक श्रवण माझें करविती ॥३०॥
करविती परी कैशा रीतीं ॥ समरंगणींचा भाव दाविती ॥ शत्रुअनली प्राणाहुती ॥ वेंचूं ऐसें म्हणताती ॥३१॥
तरी समय पडतां दृष्टीं ॥ जीवित्व रक्षिती बारा वाटीं ॥ मग कोण कोठील मोह पोटीं ॥ जीवित्वाचा वरिती गे ॥३२॥
तरी हें तैसे तुझें बोलणें ॥ दावीत मातें चांगुलपण ॥ परी समय पडतां अर्थ ॥ भिन्न दुसराचि आहे गे ॥३३॥
कीं बहुरुपियाचे खेळमेळीं ॥ होऊनि बैसती महाबळी ॥ परी ते शूरपणाची नव्हाळी ॥ समरभूमीं चालेना ॥३४॥
कीं श्वानपुच्छाची कैशी उग्रता ॥ परी हार तेचि पडे बळी देखतां ॥ जैसी पालीची दृष्टी देखतां ॥ वृश्चिक नांगी उतरीतसे ॥३५॥
तन्न्यायें तव बोलणें ॥ मातें दिसतें सहज स्थितीनें ॥ ऐसें बोलतां भर्तरीनंदनें ॥ पिंगला वदे स्वामीसी ॥३६॥
म्हणे महाराजा प्राणेश्वरा ॥ या बोलाच वाग्दोरा ॥ कंठीं बांधिला आहे नरा ॥ काया वाचा मानसीं ॥३७॥
तरी आतां व्यर्थ बोलून ॥ नेणो घडेल अर्थ कोण ॥ ईश्वरसत्तेचें प्रमाण ब्रह्मांदिका कळेना ॥३८॥
परी माझिये भावनेऐसें ॥ येत आहे स्वचित्तास ॥ विधवा शब्द शरीरास ॥ लिप्त होणार नाहीं कीं ॥३९॥
जरी म्हणाल कैशावरुन ॥ तरी काया वाचा चित्त मन ॥ तुम्हांलागीं केलें अर्पण ॥ साक्ष असे ईश्वर तो ॥४०॥
तरी ईश्वर तो सत्याश्रित ॥ आहे म्हणती सकळ जगतीं ॥ तरी वैधव्य शब्द जगमुखांत ॥ मातें लिप्त होणार नाहीं कीं ॥४१॥
असो बीज पेरिलें तैसे फळ ॥ दुमकोमादि दावी सकळ ॥ तेवीं माझो चाली सरळ ॥ फळ उमटेल तैसेंचि ॥४२॥
ऐसें बोलूनि निवांतपणीं ॥ स्तब्ध राहिली कामिनी ॥ परी रायाचे अंतःकरणीं ॥ शब्द सदृढ मिरवलें ॥४३॥
मिरवले परी ठेविले मनांत ॥ चमत्कार पाहूं कोणे दिवसांत ॥ असो हे जल्प बहु दिनांत ॥ सारिते झाले प्रीतीनें ॥४४॥
सहज कोणे एके दिवशीं ॥ राव जातसे पारधीसी ॥ मृगुया खेळतां विपिनासी ॥ आठव झाला कांतेचा ॥४५॥
कीं आम्ही उभयतां दोघे जण ॥ बैसलों होतों सुखसंपन्न ॥ तयामाजी मृत्यु बोलोन ॥ निश्चयविलें कांतेनें ॥४६॥
तुम्ही झालिया गतप्राण ॥ तुम्हांसवे करीन गमन ॥ तरी त्या बोलाचें साचपण ॥ आज पाहूं निश्चये ॥४७॥
ऐसी चित्तीं योजना करुन ॥ मृगया करीत फिरे कानन ॥ तों अकस्मात देखिला नयनें ॥ मृग एक नेटका ॥४८॥
राव देखतां तयापाठीं ॥ लागूनि शीघ्र महीं आर्हाटी ॥ शीणचि त्या जीवीं बहु मेळथाटी ॥ मृग जीवंत धरियेला ॥४९॥
धरियेला परी हस्तेंकरुन ॥ तयाची ग्रीवा छेदून ॥ मुकुटासह काढूनि भूषणें ॥ रुधिरें अस्त्रें भिजविलीं ॥५०॥
भिजवोनियां सेवकाहातीं ॥ देता झाला शीघ्र नृपती ॥ अन्य भूषणें उभवूनि कांती ॥ सुखासनीं बैसला ॥५१॥
उत्तम छाया पाहून ॥ तयाखालीं नृप जाऊन ॥ उत्तम चीर कनकवर्ण ॥ मृदु गालिचा आंथरला ॥५२॥
तयावरी बैसूनि नृपती ॥ मंडळी दुरावूनि बैसे एकांती ॥ परी रुधिरवस्त्रें जयाहातीं ॥ तयालागीं पाचारी ॥५३॥
म्हणे ही रक्तवस्त्रें घेऊन ॥ सेवका पिंगलेचें गांठीं स्थान ॥ वस्त्रें तीतें गोचर करुन ॥ राव निमाला म्हणावें ॥५४॥
निमाला परी कैसें रीती ॥ जरी पिंगला बोलले उक्ती ॥ तरी व्याघ्र संधांनी जीवित्वआहुती ॥ घेऊनियां पळाला ॥५५॥
ऐसें वदोनि राव भृत्यातें ॥ गुप्त पाठविला अवंतिकेतें ॥ राजसदना जाऊनि भृत्यें ॥ पिंगलेतें विलोकिलें ॥५६॥
मौळीचीरासह सकळ ॥ रुधिरव्याप्त वस्त्रें सबळ ॥ पुढें ठेवूनि करकमळ ॥ जोडूनियां बोलतसे ॥५७॥
म्हणे जी महाराज महीस्वामिनी ॥ मृगया करीत राव काननी ॥ अवचित व्याघ्र जाळींतुनी ॥ उठला राया न कळतां ॥५८॥
मागाहूनि साधूनि उड्डाण ॥ राव धरिला ग्रीवेकारण ॥ धरितांचि हरुनि प्राण ॥ रुधिर पिऊनि पळाला ॥५९॥
आतं त्याचें करुनि दहन ॥ चमू येईल सकळ परतोन ॥ ऐसें पिंगला ऐकून ॥ हदय पिटी आक्रोशें ॥६०॥
हदय पिटूनि महीवरती ॥ भावें आपटी निष्ठुरगती ॥ अहा म्हणूनि केश हातीं ॥ धरोनियां लुंचीतसे ॥६१॥
शब्द करुनि अट्टाहास ॥ हंबरडा मारुनि उदास ॥ पुन्हां महीतें मस्तकास ॥ वारंवार आफळीतसे ॥६२॥
मृत्तिका घेऊनि टाकी मुखांत ॥ म्हणे हा जी प्राणनाथ ॥ कैसे टाकूनि गेलांत मातें ॥ परत्रदेशभुवनासी ॥६३॥
अहा महाराजा प्राणेश्वरा ॥ कूपीं कापिला कैसा दोरा ॥ अहा तव प्रीतीचा मोहझरा ॥ आज कैसा आटला जी ॥६४॥
अहो मम प्राणनाथा ॥ मजविण तुम्हां क्षण गमत नव्हता ॥ प्रीती सोडूनि कैसे आतां ॥ परत्र देशा गमलेती ॥६५॥
ऐसें म्हणोनि आरंबळत ॥ तों अंतःपुरीं समजली मात ॥ स्त्रिया राजाच्या द्वादश शत ॥ आरंबळत पातल्या ॥६६॥
एक हदय पिटिती आपुलें हस्तीं ॥ एक धांवती महीं पडती ॥ एक ऐकतांचि झाली वरती ॥ महीलागीं मूर्च्छित ॥६७॥
एक हंबरडा फोडूनि ऊर्ध्व ॥ म्हणती आमुचा गेला निध ॥ आतां महीतें स्त्रीवृंद ॥ दीनवंत झालों कीं ॥६८॥
ऐसें म्हणोनि आरंबळती ॥ एकमेकींच्या गळां पडती ॥ हदय पिटूनि आपटिती ॥ महीलागीं मस्तक तें ॥६९॥
ऐसा सकळ अंतःपुरांत ॥ कोल्हाळ झाला अदभुत ॥ परी पिंगला दारा प्रीतीं बहुत ॥ शोक करी आक्रोशें ॥७०॥
म्हणे महाराजा निढळवाणी ॥ मज कैसे गेलेत जी सांडोनी ॥ मोहाचा सकळ तरणी ॥ लोपोनियां महाराजा ॥७१॥
बाळाहूनि मोह अत्यंत ॥ मजविषयीं पाळीत होतेत ॥ तो मोह दवडूनि निष्ठुरवर ॥ सांडूनि कैसे गेलांत ॥७२॥
अहो तुम्ही राया सिंहासनी ॥ बैसत असतां राजकारणीं ॥ परी मम स्मरण होतां मनीं ॥ या धांवूनि सदनांत ॥७३॥
ऐसें म्हणोनि धरणीवर शरीर ॥ पिंगला टाकी वारंवार ॥ आजि सकळ सांडोनि राज्यभार ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७४॥
पाहूनि माझें मुखमंडन ॥ पुन्हां सेविसी राज्यासन ॥ मोह आजि सकळ सांडोन ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७५॥
अहा पिंगला अंडजखाणी ॥ कोठें गेलीसे मम पक्षिणी ॥ दाही दिशा ओस करोनी ॥ अचर रानीं चरावया ॥७६॥
मम पाडसाची हरिणी ॥ परत्र तृण गोड पाहुनी ॥ तिकडेचि गुंतली लोभेंकरुनी ॥ माझा लोभ सांडोनियां ॥७७॥
अहा मज आंधळ्याची काठी ॥ हिसकूनि नेली निर्दये पोरटी ॥ कीं क्षुधिताची अन्नवाटी ॥ जिंतूनि नेली भणंगें ॥७८॥
अहा राया मजवांचून ॥ तूतें गमत नव्हतें एक क्षण ॥ आज निष्ठुर मन करुन ॥ कैसा गेलासी महाराजा ॥७९॥
अहा राया उत्तम पदार्थ ॥ जो महीलागीं उत्पन्न होत ॥ तो मम आधीं नृपनाथें ॥ भक्षिला नाहीं कधीं कीं ॥८०॥
मातें बैसवोनि निजअंकास ॥ मुखीं ओपीत होता ग्रास ॥ ऐसेपरी सांडोनि प्रीतीस ॥ परत्र कैसे गेलांत ॥८१॥
ऐसेपरी नाना गुण ॥ आक्रंदतसे आठवून ॥ मग ते सेवेकातें पाचारुन ॥ शय्यासाहित्य करवीतसे ॥८२॥
रायमौळीचा चीरमुगुट ॥ परिधानी कबरी अलोट ॥ स्फुरण दाटोनि मग बळकट ॥ उत्तम चीरीं कवळिला ॥८३॥
स्वामीचें वस्त्र परिधान करुन ॥ घेती झाली सतीचें वाण ॥ स्मशानवाटिकेचें साधन ॥ सिद्ध केले तत्काळ ॥८४॥
मग सकळ समारंभासहित ॥ येती झाली स्मशानवाटिकेंत ॥ अग्निकुंडीं विधानें करुन त्यांत ॥ सबळ अग्नि चेतविला ॥८५॥
अग्नि लावितां विधानशक्तीं ॥ दाहूनि वर्तल अंगारनीतीं ॥ धगधगोनि कुंडाप्रती ॥ पावक शक्ति दावीतसे ॥८६॥
ऐसिया प्रकरणीं पेटविला वन्ही ॥ होतां पातली सौदामिनी ॥ अग्निकुंडी शिळा स्थापोनी ॥ निरोप मागे सर्वातें ॥८७॥
सकळां जय देऊन आशीर्वचन ॥ जय जय भर्ता ऐसें म्हणोन ॥ तुझा देह तुज अर्पण ॥ शीघ्रकाळीं होवो कां ॥८८॥
ऐसे म्हणोनि अग्निकुंडांत ॥ सांडिती झाली स्वशरीरातें ॥ परी त्या पावकीं होतां स्थित ॥ गुंडाळोनि गेली सर्वस्वीं ॥८९॥
मग ते याचक अपार जन ॥ धन्य म्हणती तियेकारण ॥ स्वहित केलें पिंगलेनें ॥ स्वामीसवें गमूनियां ॥९०॥
अहा पिंगला ऐसें म्हणती ॥ पवित्र जाया सत्यवती ॥ उदार कर्ण स्वकुळाप्रती ॥ परकुळातें तारील ॥९१॥
भर्तरीपरी करितां परलोक ॥ विव्हळ चित्ती करिती शोक ॥ म्हणती आम्हां प्रजेचें दोंदिक ॥ ईश्वरें कैसें नेलें हो ॥९२॥
ऐसें म्हणोनि आक्रंदती ॥ भर्तरी म्हणोनि आठविती ॥ असो पावकीं दाहोनि सती ॥ लोक निघाले माघारे ॥९३॥
आपुलाल्या सदनीं जाऊन ॥ बैसले असतीं मुख वाळवोन ॥ अहा भर्तरी ऐसें म्हणोन ॥ श्वासोच्छवास सोडिती ॥९४॥
आणि राजसदनीं स्त्रियांचा मेळ ॥ शोक करीत अति तुंबळ ॥ तों येरीकडे विपिनीं नृपाळ ॥ मृगया करुनि येतसे ॥९५॥
तों अस्तासी गेला चंडमणी ॥ रात्र दाटली परम विपिनीं ॥ म्हणोनि राजा उठोनी ॥ नगराप्रती चालिला ॥९६॥
पावकतेजीं देदीप्यमान ॥ हिलाल मागीं प्रदीप्त करुन ॥ जातां भृत्य पाठविला वस्त्रें देऊन ॥ आठव तयाचा पैं झाला ॥९७॥
राव बैसूनि सुखासनीं ॥ येतां मागीं मशाली पेटवोनी ॥ त्यांत चंद्रज्योती शशिसमानी ॥ दिशेलागीं उजळती ॥९८॥
आठव होतांचि म्हणे चित्तांत ॥ अबुद्धिपणें स्त्रियांची जात ॥ नेणों गृहीं कैसी मात ॥ घडोनि आली असेल कीं ॥९९॥
म्यांहीं केलें मूढपण ॥ शोध केला नाहीं आणिका पाठवोन ॥ सकल भ्रांतीत चित्त गोंवोन ॥ पाठीं लागलों मृगाच्या ॥१००॥
परी मातें दिसतें अहित ॥ मूर्खपणा घेतला स्वपदरांत ॥ ऐसी चिंता करीत ॥ अवंतिके पातला ॥१॥
परी यांत श्रोते कल्पना घेती ॥ पिंगला दाहिली पावशक्ति ॥ तेव्हां विक्रम नृपती ॥ शोध कैसा अंतरला ॥२॥
आणि जो भृत्य आला वस्त्रें घेऊन ॥ तेणें कैसें पाहिलें निर्वाण ॥ तरी तो पिंगलेतें वस्त्रें देऊन ॥ आला होता अरण्यांत ॥३॥
परी रायाची न पडूनि गाठी ॥ कटक शोधितां महीपाठीं ॥ मग तो अस्तमान होतां शेवटी ॥ कटकालागीं मिळाला ॥४॥
आणि त्या समयीं विक्रम नृपवरें ॥ सेविलें होतें मातुळघर ॥ मिथुळेस जाऊनि समाचार ॥ सत्यवर्म्याचा घेतसे ॥५॥
मग सुमतिप्रधान चमूसहित ॥ शुभविक्रमरायादि प्रज्ञावंत ॥ सकळ मंडळीही ज्ञानभरित ॥ रायासवें गेली ती ॥६॥
गृहीं तितुकें स्त्रीमंडळ ॥ ग्रामजनादि रक्षपाळ ॥ सकळ अबुद्धि केवळ ॥ ज्यांते शक्ति नातुडली ॥७॥
ऐसा समय आला घडून ॥ तों त्यांतही घडलें अपार विघ्न ॥ पिंगला अबुद्धिपणें रत्न ॥ देहान्त पावली ॥८॥
असो पाहिली मार्गवाट ॥ राव भर्तरी चमूनेट ॥ येऊनि अवंतिकेनिकट ॥ ग्रामद्वारीं संचारला ॥९॥
तंव ते उठोनि द्वारपाळ ॥ रायासमोर झाले सकळ ॥ आश्चर्य मानूनि उतावेळ ॥ रायाप्रती वदताती ॥११०॥
म्हणती परी कैसे रीतीं ॥ नम्रोत्तरें मंजुळ करिती ॥ मुजरे करुनि निवेदिती ॥ पिंगलेचा वृत्तांत ॥११॥
म्हणती महाराज दिनमणी ॥ भृत्य एक आला वनांतूनी ॥ तो दुश्विन्ह वदोनि वाणी ॥ ग्राम बुडविला शोकांत ॥१२॥
परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी ॥ सती पडली सुमति बळी ॥ नरस्वामिनी पिंगला दवडिली ॥ परत्र देशीं गेलीसें ॥१३॥
तरी तियेची करुनि बोळवण ॥ आतांचि गृहीं आले सकळ जन ॥ स्मशानवाटिका झाली भस्म ॥ एक प्रहर लोटला ॥१४॥
ऐसें राव ऐकतां वचन ॥ परम घाबरलें अंतःकरण ॥ मग सुखासनांतूनि उडी टाकून ॥ स्मशानवाटिके पातला ॥१५॥
पातला परी आक्रंदत ॥ अट्टहास्यें शब्द करीत ॥ अति लगबगें धांवत ॥ स्मशानवाटिकेजवळी पैं ॥१६॥
पातला परी चूम मागें ॥ करीत जातसे अति लाग ॥ सकळ कुळवृद्ध योग ॥ रायालागीं कवळिती ॥१७॥
राव जाता स्मशानमहीसी ॥ पहात पिंगलेचे चित्तेसी ॥ रव विरागी होऊनि मानसीं ॥ उडी टाकूं म्हणतसे ॥१८॥
परी ते चमूमेळीचे गृहस्थ थोर ॥ रायासी कवळूनि धरिती समग्र ॥ स्मशानकुंडीचा वैश्वानर ॥ वेष्टूनियां बैसले ॥१९॥
परी राव ते उद्देशी ॥ प्राणघात इच्छी मानसीं ॥ परी वेष्टन पडतां शरीरासी ॥ उपाय कांहीं चालेना ॥१२०॥
मग बैसल्या ठायीं आरंबळत ॥ महीं मस्तकातें आपटीत ॥ हदय पिटूनि शोक करीत ॥ मूर्च्छनेलागी पावतसे ॥२१॥
मूर्च्छा गेलिया पुन्हां उठत ॥ अग्नीं आहुती द्यावया पहात ॥ परी अपार जनांचे वेष्टन बहुत ॥ बळ कांहीं चालेना ॥२२॥
ऊर्ध्व करुनि आपुला माथा ॥ घडी घडी पाहे पिंगलाचिता ॥ अहा म्हणोनि भाळ तत्त्वतां ॥ महीलागीं आफळीतसे ॥२३॥
आफळूनि आठवी पिंगलेचें गुण ॥ म्हणे कैसी वो गेलीस मज सांडून ॥ मातें मृत्युमहीं ठेवून ॥ परत्र कैसी झालीस ॥२४॥
हें पिंगले तुझे मन ॥ गमत नव्हतें मजवांचून ॥ आतां कैसी निष्ठुर होऊन ॥ परत्रदेशीं गेलीस तूं ॥२५॥
हे पिंगले तुझा मी पती ॥ नव्हतों शत्रु होतो या जगतीं ॥ कैसें जल्पूनि कुडेमती ॥ भस्म तूतें म्यां केलें ॥२६॥
अहा मी पतित दुष्ट दुर्जन ॥ मूढमतीनें घेतला प्राण ॥ तरी मी तुझा शत्रु पूर्ण ॥ पति न म्हणें पिंगलें ॥२७॥
ऐसें म्हणोनि अंग धरणीं ॥ टाकी हा हा शब्द करोनी ॥ हदय पिटी दणाणोनी ॥ महीं मस्तक आफळीतसे ॥२८॥
अहा पिंगला म्हणोन ॥ हांक मारी अट्टहास्येंकरुन ॥ अहा पिंगले एकदां तव वदन ॥ मज दृष्टी दावीं कां ॥२९॥
अहा पिंगले परत्रभुवनीं ॥ गेलीस मातें तूं सांडोनी ॥ हदय पिटी दणाणोनी ॥ महीं मस्तक आफळीतसे ॥१३०॥
हें पिंगले आसनीं शयनीं ॥ मज बैसवीत होतीस अंतःकरणी ॥ आतां माझा विसर धरोनि ॥ कैसी राहसी परत्र ॥३१॥
अहा पिंगले तुजवांचून ॥ सर्वत्र मातें दिशा शून्य ॥ अहा पिंगला माझा प्राण ॥ कुडी टाकून गेलासे ॥३२॥
अहा पिंगले तुजवांचून ॥ सर्वत्र मातें दिशा शून्य ॥ शून्यमंदिरीं निद्राशयन ॥ कैसें येईल सांग पा ॥३३॥
अहा पिंगले माझी अधिक ॥ जाणत होतीस तृषाभूक ॥ आतां निष्ठुर मन केलें निक ॥ कैसी सांडूनि गेलीस तूं ॥३४॥
अहा पिंगले माझे शयनीं ॥ होतीस मृदु भाषणें करुनीं ॥ पाहतां उर्वशी दिसे नयनी ॥ संतोष माझा होतसे ॥३५॥
ऐसें पाहूनि सुगंधद्रव्य मी ॥ रुंजी घाली षटपदकामी ॥ ऐसें सुखसरितासंगमीं ॥ सुख कोठें पाहूं आतां ॥३६॥
यापरी पिंगले तव गुण ॥ दयचें भांडार मुक्त करुन ॥ कीं जगाचें करिसी पालन ॥ धर्मानुकूळें सर्वस्वीं ॥३७॥
ऐसिया प्रज्ञेचें पहुडपण ॥ पिंगले कोठें मी जाऊन ॥ ऐसें म्हणूनि धडाडून ॥ धरणीं अंग सांडीतसे ॥३८॥
यापरी सर्व जाणोनि लोक ॥ रायाचा पाहूनि शोक ॥ गहिंवर येतसे आणीक ॥ शोकशब्देंकरुनियां ॥३९॥
कीं तरु मलयागरा ॥ गंधी मिरवती समग्रा ॥ तैसें रायाच्या शोकपारा ॥ शोकें व्याकुळित जाहले ॥१४०॥
असो हा ग्रामांत वृत्तांत सकळां ॥ कळला परी सुखवसा झाला ॥ जैसा प्राण जावोनि आला ॥ शवशरीरा पुन्हां कीं ॥४१॥
मग गांवीचें ग्रामजन ॥ स्मशानाजवळी आले धावोन ॥ परी रायाचा शोक पाहून ॥ तेही तैसेचि होती पैं ॥४२॥
परी तो मायिक सहजस्थितीं ॥ दुःखरहित शोकावरती ॥ जैसे बहुरुपी खेळाप्रती ॥ शूरत्व मिरविती अपार ॥४३॥
कीं गुर्जरदेशीं चाल सधन ॥ रुदन घेती मोल देऊन ॥ तैसे घरचे सर्व जन ॥ येती प्रेतसंस्कार करावया ॥४४॥
तन्न्यायें शोक करीत ॥ राव पडला शोकार्णवांत ॥ न वर्णवे तो आकांत ॥ अल्प येथे वर्णिला ॥४५॥
असो ऐसी रुदनस्थिती ॥ ज्याची त्याला माया चित्तीं ॥ परी ते लोक अभाव नीतीं ॥ समजाविती रायातें ॥४६॥
तुम्ही सर्वज्ञ सकळराशी ॥ बोध करिता अन्य जनासीं ॥ होऊनी गेलें होणारासी ॥ आश्चर्य याचे कायसें ॥४७॥
म्हणती महाराजा भविष्योत्तर ॥ होऊनि गेलें ते होणार ॥ तयाच शोक करणें चतुर ॥ योग्य आम्हां दिसेना ॥४८॥
अशाश्वताचा शोक करणें ॥ तरी काय शाश्वत आपुलें जिणें ॥ पिंगला गेली आपणही जाणें ॥ कदाकाळीं सुटेना ॥४९॥
पहा आपुले पूर्वज अपार ॥ मृत्यु पावले समग्र ॥ एकामागें एक सर्वत्र ॥ गेले न राहिले मेदिनी ॥१५०॥
कीं आजा गेला नातु उरला ॥ ऐसा कोणी पाहिला ॥ तरी अशाश्वताचा घट भरला ॥ रिता होय क्षणमात्रें ॥५१॥
तरी हे सकळ अशाश्वतपण ॥ पूर्ण मानिती ज्ञानवान ॥ तरी तयाचा शोक करुन ॥ व्यर्थ जीवा कष्टवितां ॥५२॥
अहा पाहती जपी तपी ॥ सिद्ध साधक नानारुपी ॥ कोण वांचले देहसंकल्पी ॥ मृत्युभुवनीं महाराजा ॥५३॥
तरी जी जी जाईल घडी ॥ तीं सुखाचीच मानावी प्रौढी ॥ ईश्वरनामीं ठेवूनि गोडी ॥ चित्त स्थिर असावें ॥५४॥
ऐसें बोधितां सर्वही जग ॥ युक्तिप्रयुक्तीं नानाबोध ॥ परी रायाचे हदय चांग ॥ शोककाजळी उजळेना ॥५५॥
मग ते ग्रामीचे सकळ जन ॥ थकित झाले बोध करुन ॥ एकामागें एक उठोन ॥ आपुल्या सदना सेविती ॥५६॥
असो तीही लोटली रात्री ॥ उदया आला गभस्ती ॥ पिंगलाचितेची पाहुनि शांती ॥ पावक झाला अदृश्य ॥५७॥
मग तो मानूनि दुसरा दिन ॥ पुन्हां पातले आप्तजन ॥ उत्तरक्रिया संपादोन ॥ अस्थिमिलन केले तैं ॥५८॥
तें भर्तरीरावें पाहून ॥ चित्तीं विचार करितां पूर्ण ॥ घेऊं देईना अस्थिसंचयन ॥ स्पर्श कोणा न करवी ॥५९॥
आपण बैसूनि चिता रक्षीत ॥ कोणा लावूं देईना हात ॥ मग ते आप्त जन समस्त ॥ पुन्हां गेले माघारे ॥१६०॥
परी तो राव तैसाचि चितेंत ॥ बैसता झाला दिवसरात ॥ अन्नपाणी त्यजूनि समस्त ॥ पिंगला पिंगला म्हणतसे ॥६१॥
मग हें निर्वाणीचें वर्तमान ॥ मिथुळेसी दूत सांगती जाऊन ॥ राव विक्रम करितां श्रवण ॥ निघता झाला तेथोनी ॥६२॥
सत्यवर्मादि शुभविक्रम ॥ विक्रमादि सुमति प्रधान ॥ परम शोकार्णव रचून ॥ अवंतिके पातले ॥६३॥
मग येतांचि स्मशानवाटीं ॥ पिंगला आणूनि चित्तदृष्टि ॥ परम शोकें जाहला कष्टी ॥ शोकसिंधूंत निमग्न ॥६४॥
आठवी सर्व कन्येचे गुण ॥ म्हणें मम हातीचें गेलें निधान ॥ विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न ॥ काळतस्करें नेलें कीं ॥६५॥
अहा माउली उभयकुळांत ॥ तारक झाली भवसरितेंत ॥ पुन्हां दीपाची लावी वात ॥ अदृश्य कैसी झाली वो ॥६६॥
अहा स्त्रीकटकीं अंतःपुरीं ॥ मुख्य मिरवीत होती सज्ञानलहरी ॥ जैसा हस्ती चमूभीतरी ॥ चांगुलपण दावीतसे ॥६७॥
रुपवंत गुणवंत ॥ सर्व लक्षणीं ज्ञानवंत ॥ सूचक सदा सर्वकाळ संगोपीत ॥ चित्त सकळांचे लक्षी कीं ॥६८॥
ऐसे आठवोनि नाना गुण ॥ शोक करी अति दारुण ॥ मग विक्रम नृपति पुढें होऊन ॥ भर्तरीलागीं समजावी ॥६९॥
नाना युक्ति नाना वचन ॥ भर्तरीचें बोधी मन ॥ परी तो नायके पिसाटपण ॥ पिंगला पिंगला वदतसे ॥१७०॥
परी राव बोध करितां उत्तम ॥ लोटून गेला दिन दशम ॥ मग विक्रमें उत्तरक्रिया करुन ॥ शुचिर्भूत जाहला ॥७१॥
यापरी पुढें तेरावे दिवशीं ॥ जातिभोजन दानमानेसी ॥ सर्व उरकोनि राज्यासनासी ॥ घेऊनि राव बैसला ॥७२॥
भर्तरी न सोडी स्मशानवाटिका ॥ धरुनि बैसला अचळ निका ॥ जैसा वृंदे धरुनि हेका ॥ विष्णु बैसला स्मशानीं ॥७३॥
ऐसेपरी अचलपण ॥ मिरवता झाला मित्रनंदन ॥ परि नित्य नित्य विक्रम येऊन ॥ बोध त्यातें करीतसे ॥७४॥
ऐसा बोध करितां नित्य ॥ द्वादश वर्षे लोटलीं सत्य ॥ पर्णतृण भक्षूनि जीवित ॥ उदकआहारें राखिलें ॥७५॥
अहा देवा अनाथनाथा ॥ कैसें केलें त्वां अनंता ॥ पिंगला माझी सगुण कांता ॥ तूतें कैसी आवडली ॥७६॥
ऐसें म्हणोनि नामोच्चार ॥ शोक करीतसे वारंवार ॥ रात्रदिवस चित्तीं विसर ॥ पिंगलेचा पडेना ॥७७॥
कृश शरीर झालें तेणें ॥ कंठी उरलासे प्राण ॥ मुखीं आणूनि हरीचें नाम ॥ शोकें पिंगला वदतसे ॥७८॥
ऐसीं लोटलीं द्वादश वर्षे ॥ शुचिष्मंत झालें शरीर कृश ॥ तें पाहूनियां अति क्लेश ॥ मित्रावरुणी द्रवलासे ॥७९॥
पुत्रमोहाचे अपार भरतें ॥ लोट लोटले चित्तसरिते ॥ मग मित्रावरुणी तुष्टोनि मनांत ॥ अत्रिजानिकटीं पातला ॥१८०॥
तंव तो प्राज्ञिक अत्रिनंदन ॥ मित्रावरुणीस सन्मान देऊन ॥ म्हणे महाराजा कामना कोण ॥ धरुनि येथें आलासी ॥८१॥
येरी म्हणे जी द्विजोत्तमा ॥ ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा ॥ जाणत असूनि पुससी आम्हां ॥ अज्ञानत्व घेऊनि ॥८२॥
तरी तव शिष्य जो भर्तरी ॥ त्याची कैसी झाली परी ॥ तें हदयीं आणूनि हितातें वरी ॥ विलोकी कां महाराजा ॥८३॥
मग तो महाराजा ज्ञानवान ॥ हदयीं पाहे विचारुन ॥ तों विपत्काळीं शोकेंकरुन ॥ भर्तरीनाथ मिरवला ॥८४॥
अति क्लेश तयाचे पाहून ॥ परम द्रवला मोहेंकरुन । मग मित्रावरुणीतें बोले वचन ॥ चिंता न करी महाराजा ॥८५॥
तुम्हीं जावें स्वस्थानासी ॥ मी भर्तरीचे आहे उद्देशीं ॥ स्वहित करीन चिंता मानसीं ॥ पाळूं नका महाराजा ॥८६॥
माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ ॥ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत ॥ तो महीं भ्रमत करीत तीर्थ ॥ येथें येईल महाराजा ॥८७॥
तो परम आहे प्रज्ञावान ॥ तयासी तेथे पाठवीन ॥ तो नाना प्रयुक्ती करुन ॥ शुद्ध पंथा आणील कीं ॥८८॥
ऐसें बोलता मित्रावरुणीसी ॥ संतोषें मिरवला तो चित्तासी ॥ मग पुसूनी अनसूयात्मजासी ॥ स्वस्थानासी पैं गेला ॥८९॥
यावरी पुढील अध्यायीं कथा सुंदर ॥ अध्यात्मदीपिका मनोहर ॥ मालू सांगे धुंडीकुमर ॥ नरहरीकृपेंकरोनियां ॥१९०॥
दत्त सांगेल गोरक्षनाथा ॥ गोरक्ष येऊनि विरहसरिता ॥ शोषण करील तत्त्वतां ॥ घटोदभवाचे कृपेनें ॥९१॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टाविंशति अध्याय गोड हा ॥१९२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय २८॥ ओव्या ॥१९२॥
॥ नवनाथभक्तिसार अष्टाविंशतितमोध्याय समाप्त ॥
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें