श्रीगणेशाय नमः
जयजयाजी कमळानना ॥ दुष्टदानवअसुरमर्दना ॥
भक्तकामचकोरचंद्रानन ॥ यादवेंद्रा आदिपुरुषा ॥१॥
हे पयोब्धिवासा यदुकुळटिळका ॥ पुढें बोलवीं कथानका ॥
जेणें श्रोतियां चित्तदोंदिका ॥ आनंदाब्धि उचंबळे ॥२॥
मागिले अध्यायीं सौराष्ट्रग्रामीं ॥ गोरक्षानें मीननाथा मारुनी ॥
पुन्हां उठविलें परीक्षा देऊनी ॥ श्रीगुरुच्या भावने ॥३॥
मच्छिंद्रें धरुनि अज्ञानपण ॥ मीननाथासवे केलें रुदन ॥
परी गोरक्षाचें जाणीवपण ॥ परीक्षेंतें आणिलें ॥४॥
असो यापरी तेथूनि निघून ॥ मार्गी करीत चालिले गमन ॥
तों तैलंगदेशीं गोदासंगमन ॥ समुद्रतीरा पातले ॥५॥
गोदांसंगमीं करुनि स्नान ॥ आत्मलिंग शिवातें भावें पूजून ॥
तेथूनि गोदेचे तट धरुन ॥ पांश्वमदिशे गमताती ॥६॥
तों बारा लिंगांतील लिंग समर्थ ॥ आंवढ्या आणि परळी वैजनाथ ॥
तैं करुनियां सव्य गोदातीर्थ ॥ घेऊनियां चालिले ते ॥७॥
मार्गी चालितां गोदा सव्य ॥ तो वाल्मीकस्थान विपिनमय ॥
गर्भगिरि पर्वतप्राय ॥ येऊनियां तेथें पोचले ॥८॥
तें रान कर्कश अचाट ॥ गगनचुंबित तरु अफाट ॥
तयांमाजी तृण अफाट ॥ न मिळे वाट चालावया ॥९॥
व्याघ्र जंबूक शार्दूळ हरी ॥ वराह रीस काननातरीं ॥
हिंडती ते उन्मत्तापरी ॥ उग्र वेष दावूनियां ॥१०॥
जाळिया वेली कर्दळी सघन ॥ कीं जेथें रश्मींचें न पवे दर्शन ॥
कीं अर्कोदया लपे गगन ॥ ऐसा भास वाटतसे ॥११॥
बोरी बाभळ पळस शमी ॥ रातांजन कंदर्क्प अनेकनामी ॥
खैर हिंवर कंटकधामी ॥ काननांत तरु मिरवती ॥१२॥
एक तुराट्ट अर्की फुल्लाट ॥ वरकड तीक्ष्ण कंटकनट ॥
तेवीं कनकखंडजाळी अचाट ॥ पर्णकुटिका जैसा कीं ॥१३॥
तयांमाजी तृण उचित ॥ स्थावर तरु जाहले व्यक्त ॥
तेणें धरादेवींचें सहसा नितांत ॥ झाकिन्नले शरीर ॥१४॥
महा तें कानन सुरस ॥ वसन नेसविलें भूदेवीस ॥
हरितवर्णी कुसुमपदरास ॥ बुटलिंगी मिरवली ॥१५॥
म्हणाल कासया नेसली वसन ॥ तो परपुरुष दिनकर गगनीं ॥
म्हणूनि कुळवंत दारा लज्जेनें ॥ स्वशरेंरा लपवी ती ॥१६॥
म्हणूनि मित्रकांता जागा ॥ सांडूनि बैसल्या अंबुजभागा ॥
धरादेवीच्या लज्जित मार्गी ॥ लक्षूनियां रक्षिंले ॥१७॥
ऐसियापरी कानन अचाट ॥ दर्शन नोहे महीपाठ ॥
तेथें पाहूनि मच्छिंद्र सुभट ॥ मनामाजी दचकला ॥१८॥
दचकला परी कवण अर्थ ॥ कनकंवाटे जे होती भस्मझोळींत ॥
तस्कर कोणी हरतील तीतें ॥ म्हणूनि चित्तीं विस्मित ॥१९॥
तैसा नव्हे आणिक अर्थ ॥ गोरक्षाचा लोभी स्वार्थ ॥
पहावया परीक्षेंत ॥ मच्छिंद्रनाथ उदेला ॥२०॥
आपण घेऊनि अज्ञान ॥ पाहे गोरक्षाचें लक्षण ॥
नातरी प्रतापवान ॥ तस्करभय त्या नाहीं ॥२१॥
कीं ये तमाचा प्रतापजेठीं ॥ अर्का संचरे भय पोटीं ॥
कीं उदधीचीं बळी चंचुपुटीं ॥ लागतां कोप काय थरथराटे ॥२२॥
कीं मशकाचे उड्डाणें ॥ मंदराचळ व्यापेल कीं भयानें ॥
कीं सर्पकृत किंवा वृश्चिकदंशानें ॥ खगेंद्रा काय भय त्याचे ॥२३॥
तन्न्यायें मच्छिंद्रनाथ ॥ पाळूं न शके तस्कर तयातें ॥
परी श्रीगोरक्षाचें चित्त ॥ परीक्षेसी उदेलें ॥२४॥
कल्पूनि चित्तीं ऐसियापरी ॥ मग गोरक्षातें जती वागुत्तरीं ॥
बोलतां झाला काननांतरी ॥ पाचारुनि निकटत्वें ॥२५॥
म्हणे वत्सा ऐक बा कैसें ॥ उद्भट दिसे विपिन कर्कश ॥
तरी कांहीं भय अरण्यास ॥ नांदतें कीं तस्करीं ॥२६॥
परम पूर्ण व्यक्त तरुदाटी ॥ जेथें अर्क न पडे दृष्टीं ॥
ऐसिये काननीं कर्कश पोटीं ॥ मज भय आज संचरलें ॥२७॥
तरी बाळा प्रज्ञावंता ॥ आहे कीं नाही भय सांग आतां ॥
तस्करभयाची समूळ वार्ता ॥ काननांत न येवो या ॥२८॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष विचार करी मनांत ॥
म्हने तस्करभय गुरुतें ॥ काय म्हणूनि उदेलें ॥२९॥
तया शब्दोदयाचा अर्थ ॥ श्रीगुरुजवळ असेल वित्त ॥
म्हणूनि हा शब्द उदयवंत ॥ झाला असेल निश्चयें ॥३०॥
तरी तो म्हणे ताता कैसे समजावें ॥ फुलावरुनि रुखा द्यावीं नांवें ॥
ऐसें शब्दावरुनि मान समजावें ॥ ओळखावें सुज्ञांनीं ॥३१॥
तस्मात् गुरुपाशीं वित्त ॥ आहे काय ऐसें विचारीत ॥
तरी या शब्दाची असे भ्रांत ॥ निरसूनि दुर करावी ॥३२॥
ऐसें योजूनि गोरक्षनाथ ॥ मौन धरोनि मार्गी चालत ॥
परी काननीं अधिकोत्तरांत ॥ भयानक दिसे पदोपदीं ॥३३॥
जंव जंव कानन भयानक दिसे ॥ तंव तंव गोरक्षा मच्छिंद्र पुसे ॥
म्हणे बा अरण्य बहु कर्कश ॥ पदोपदीं दिसतसे ॥३४॥
तरी तस्करभय येथें ॥ आहे कीं नाहीं सांग मातें ॥
परी गोरक्ष उत्तरातें ॥ काहींच तयातें न देई ॥३५॥
जैसा विश्वामित्र समर्थ ॥ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ ॥
स्तवितां तेणें दशरथातें ॥ परी उत्तर न देई कांहींच ॥३६॥
त्याचि न्यायें गोरक्ष मौन धरोनि ॥ गमतसेच सुपंथ अवनीं ॥
तों पुढें चालतां देखिलें पाणी ॥ संचळपणी स्थिरारावलें ॥३७॥
उदक पाहतां संचळवंत ॥ गोरक्षा वदे मच्छिंद्रनाथ ॥
म्हणे बा गोरक्षा संचरत येथें ॥ उदक आहे नेटकें ॥३८॥
तरी माझी झोळी कक्षेंत घालून ॥ पुढें कांहींसे करीं गमन ॥
तों मीही येतो लगबगेंकरुन ॥ दिशा फिरुन पाडसा ॥३९॥
ऐसें म्हणतां मच्छिंद्रनाथ ॥ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास ॥
मग स्कंधीं वाहूनि मीननाथास ॥ कक्षीं झोळी घातली ॥४०॥
परी घालितां कक्षे झोळी ॥ वजनवस्त लागें हस्तकमळी ॥
मग मनांत म्हणे प्रतापबळी ॥ भय यांतचि नांदतसे ॥४१॥
ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ स्कंधी वाहूनि मीननाथ ॥
मच्छिंद्रा सोडूनि थिल्लरांत ॥ पुढें जात सच्छिष्य ॥४२॥
पुढें जातां शतपावलीं ॥ कक्षेतूनि भिक्षाझोळी काढिली ॥
त्यांत पाहतां देखिली ॥ वीट उत्तम हाटकाची ॥४३॥
पाहतांचि दृष्टीं कनकवीट ॥ म्हणे कीं फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट ॥
मग दाट लक्षूनि तृण अफाट ॥ झुगारिली वीट त्यामाजी ॥४४॥
त्या कनकविटेसमाकृती ॥ पाषाण पाहूनि गोरक्षजती ॥
झोळींत घालूनि कक्षेप्रती ॥ पुन्हां नेसवी झोळीतें ॥४५॥
कक्षे झोळी घालून ॥ स्कंधीं पुन्हां मीननाथ घेऊन ॥
लगबगोंनी मार्गगमन ॥ करीत असे नाथ तो ॥४६॥
सुपंथ लक्षितां तांतडीनें ॥ एक कोस गेला त्वरेंकरुन ॥
तों मच्छिंद्रनाथ दिशा फिरुन ॥ जात मागुता तांतडी ॥४७॥
पुढें जातसे गोरक्षनाथ ॥ मागूनि मच्छिंद्र लगबगा येत ॥
परी तो नाटोपे गोरक्षनाथ ॥ मार्ग क्रमितां मच्छिंद्रा ॥४८॥
परी इतुक्या नेटें भावें ॥ मार्ग मिळतां नाटोपावें ॥
तरी लघुशंकेलागीं धावें ॥ संगतसंगमीं मिळाल्या ॥४९॥
यापरी शौचा सर्वांशीं जावें ॥ लागत आहे सर्वानुभवें ॥
संगतसंगमी होऊनियां ठावे ॥ विसांवयासी महाराजा ॥५०॥
ऐसियापरी आहे गमन ॥ तेवीं मच्छिंद्रा आले घडून ॥
परम तांतडीं करितां गमन ॥ परी तो न मिळे गोरक्ष ॥५१॥
ऐसेपरी गोरक्षनंदन ॥ पुढें चालला सुपंथपथानें ॥
मार्ग काढिला दीड योजन ॥ जाणूनि खूण अंतरींची ॥५२॥
तों अवचट देखिला तरु ॥ गोरक्ष पाहे दृष्टीपरु ॥
मनांत म्हणे व्हावें स्थिरु ॥ येऊं द्यावें नाथासी ॥५३॥
ऐसें योजूनि स्वचित्तात ॥ पाहता झाला उंबरतरुतें ॥
तों त्या ठायीं पोखरणी अदभूत ॥ वामतीर्थ देखिलें ॥५४॥
मग झोळी काढिली कक्षेंतून ॥ स्कंधीचा उतरिला नाथ मीन ॥
मग अंबुपात्र करीं कवळून ॥ पोखरणींत उतरला ॥५५॥
सारुनि आपुलें स्नान ॥ अंगीं भस्म केलें लेपन ॥
उपरी आपुले नेम सारुन ॥ घातलें स्नान मीननाथा ॥५६॥
तों मार्गाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ अति तांतडीनें आले तेथ ॥
स्नान करुनि यथास्थित ॥ नित्यकर्म सारिलें ॥५७॥
सकळ सारिलें नित्यनेमा ॥ बैसले मार्गी विश्रामा ॥
बैसल्या उपशब्दउगमा ॥ पुन्हां दावी मच्छिंद्र ॥५८॥
म्हणे बा रे गोरक्षनाथ ॥ कर्कश अरण्य येथपर्यंत ॥
आपणां लागलें भयानकवत ॥ पुढेंही लागेल ऐसेंचि ॥५९॥
येरु म्हणे जी गुरुराया ॥ याहूनि पुढें अधिक काय ॥
मच्छिंद्र म्हणें काहीं भय ॥ काननीं या आहे कीं ॥६०॥
गोरक्ष म्हणे वागुत्तर ॥ कीं महाराजा असतां जड पर डर ॥
होता जो तो डर थोर ॥ मागेंचि राहिला आहे जी ॥६१॥
आतां नाहीं डर कैंचा ॥ स्वस्थ असावें कायावाचा ॥
मागें राहिला भाव साचा ॥ जड डराचा महाराजा ॥६२॥
तरी आतां कृपादेही ॥ आपणांपाशीं डर नाहीं ॥
मग भय कैचें काननप्रवाहीं ॥ जड असल्या अचाट ॥६३॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ आपणांजवळ जड ॥ आहे बहुत ॥
हाटकवीट भस्मझोळींत ॥ स्त्रीराज्यांतूनि आणिली ॥६४॥
म्हणूनि तूतें भय स्थित ॥ विचारितां काननांत ॥
येरु म्हणे अशाश्वत ॥ जडही नसे डर गेला ॥६५॥
ऐसें म्हणतां गोरक्षनाथ ॥ मच्छिंद्राचे काय चित्तांत ॥
चित्तीं म्हणे हाटकविटेतें ॥ सांडिली की कळेना ॥६६॥
ऐसें जाणूनि स्वचित्तांत ॥ मच्छिंद्र तळमळी पहावयातें ॥
परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुनि हात ॥ पर्वतावरी नेतसे ॥६७॥
तो महापर्वत गर्भगिरी ॥ उभे चढतांचि लघुशंका करी ॥
पर्वतमाथां गोरक्ष मौन वरी ॥ मज समजेल म्हणूनी ॥६८॥
मग दोन घटिका स्वस्तिक्षेम ॥ सेविती ते विश्राम ॥
उपरी अवयव परिक्षालून ॥ मार्ग क्रमूं म्हणताती ॥६९॥
ज्याचें त्यानें वस्त्रभूषण ॥ अंगीं केलें परिधान ॥
आपुलाल्या झोळ्या घेवोन ॥ कक्षे अडकवूनि बांधिती ॥७०॥
तो मच्छिंद्र आपुली घेऊनि झोळी ॥ विकासूनि पाहे नेत्रकमळी ॥
तो कनक नसे पाषाणवळी ॥ झोळीमाजी नांदतसे ॥७१॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ धरणीवरी अंग टाकीत ॥
अहा अहा म्हणूनि आरंबळत ॥ कनकवीट गेली म्हणोनी ॥७२॥
मच्छिंद्र बोले क्रोधेंकरुन ॥ तुवां टाकिलें रे माझें धन ॥
तूतें ओझें काय दारुण ॥ झालें होतें तयाचें ॥७३॥
अहा आतां काय करुं ॥ कोठें पाहूं हा भांगारु ॥
परम यत्नें वेंचूनि शरीरु ॥ हाटक आणिले होते म्यां ॥७४॥
तरी हा थोर मध्यें अनर्थ ॥ कैसा योजिला श्रीभगवंतें ॥
हातीचें सांडूनि गेलें वित्त ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥७५॥
ऐसें म्हणोनि दडदडां धांवत ॥ पुन्हां परतोनि मागे पहात ॥
ठाई ठाई चांचपीत ॥ उकरीत महीसी ॥७६॥
ऐसी करोनि अपार चेष्टा ॥ अंग टाकी महीं प्रतिष्ठा ॥
गडबडां लोळोनि स्फुंदे स्पष्टा ॥ करकमळें पिटीतसे ॥७७॥
पुनः पुनः मही उकरी ॥ इकडे तिकडे पाषाण करीत ॥
भाळावरती ठेवूनि हस्त ॥ कर्म बुडालें म्हणतसे ॥७८॥
ऐसें म्हणोनि आक्रोश करीत ॥ दीर्घस्वरें हंबरडा फोडीत ॥
जीवास सोडूं म्हणत ॥ कैसें केलें देवानें ॥७९॥
पिशाचासम भ्रमण करीत ॥ म्हणे माझें येथें आहे वित्त ॥
धांवोनि उकरा महींतें ॥ कोणीतरी येऊनियां ॥८०॥
गोरक्षापाशीं शीघ्र येऊन ॥ म्हणे तूं माझें न देशी धन ॥
तूं कोण कोणाचा येऊन ॥ पाळतीने मिरविसी ॥८१॥
ऐसे अनाओळखीने बोलत ॥ तेणें हदयीं दचकला गोरक्षनाथ ॥
मग मच्छिंद्राचा धरोनि हात ॥ पर्वतावरी नेतसे ॥८२॥
तो महानग पर्वत गर्भगिरी ॥ उभे चढले तयावरी ॥
चढतां लघुशंका करी ॥ पर्वतमाथां गोरक्ष ॥८३॥
सिद्धीयोग मंत्र जपूनी ॥ मंत्रधार कनकवर्णी ॥
सकळ पर्वत देदीप्यमानी ॥ शुद्ध हाटकीं मिरवला ॥८४॥
मग श्रीगुरुसी नमन करुन ॥ म्हणे लागेल तितुकें घेईजे सोनें ॥
तें मच्छिंद्र पाहूनियां जाण ॥ म्हणे धन्य धन्य गोरक्षा ॥८५॥
गोरक्ष म्हणे गुरुनाथा ॥ लागेल तितुकें घ्यावें कनका ॥
येरु म्हणे तूं परीस निका ॥ लाभलासी पाडसा ॥८६॥
मग हदयी धरुनि गोरक्षनाथ ॥ म्हणे बा धन्य आहेस सुत ॥
सकळ सिद्धींचे माहेर युक्त ॥ होऊनि जगीं मिरविसी ॥८७॥
मग मी ऐसा परीस टाकोन ॥ काय करुं फार सुवर्ण ॥
उत्तम निधनालागी सांडून ॥ वल्लीरसा कां पहावें ॥८८॥
हातींचा टाकूनि राजहंस ॥ व्यर्थ कवळूं फोल वायस ॥
कीं कामधेनू असतां गृहास ॥ तक्र मागें घरोघरीं ॥८९॥
दैवें निधी लाभल्या हातीं ॥ किमर्थ शोधाव्या किमयायुक्ती ॥
चिंतामणीची असतां वस्ती ॥ चिंता करावी कासयातें ॥९०॥
तें बाळका कैसें कळे पूर्ण ॥ अर्थ लाधला तुजयोगानें ॥
आतां कासया व्हावें सुवर्ण ॥ सकळनिधी अससी तूं ॥९१॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ उपरी गोरक्ष विचार करीत ॥
म्हणे महाराजा आजपर्यंत ॥ कनक झोळी वागविलें ॥९२॥
तरी तें वागवावया कारण ॥ कोणता होता मनीं काम ॥
तीच कामना दृश्यमान ॥ मातें दावीं महाराजा ॥९३॥
येरु म्हणे वत्सा ऐक ॥ मम हदयींची होती भूक ॥
आपुले देशीं मोडूनि हाटक ॥ बहु साधुंतें पुजावें ॥९४॥
तया हाटकाचें करुनि अन्न ॥ मेळवावे अपार संतजन ॥
भंडारा करावा ऐसें मन ॥ मनकामनेतें वेधलें ॥९५॥
इतुकाचि अर्थ होता चित्तीं ॥ म्हणोनि वागविलें हाटकाप्रती ॥
यावरी बोले गोरक्ष जती ॥ तरी ही कामना फेडीन मी ॥९६॥
मग पर्वती बैसवोनि मच्छिंद्रनाथा ॥ आपण पुन्हां उतरला खालता ॥
उचलोनि नेलें माथां ॥ पर्वतमाथीं गोरक्षकें ॥९७॥
मग गंधर्वास्त्र जपोनि होटीं ॥ स्वर्गा प्रेरिली भस्मचिमुटी ॥
तेणेंकरुनि महीतळवटीं ॥ चित्रसेन उतरला ॥९८॥
श्रीनाथासी करुनि नमन ॥ उभा राहिला कर जोडून ॥
म्हणे महाराजा आज्ञा कोण ॥ काय कार्य करावें मी ॥९९॥
येरु म्हणे गंधर्वनाथा ॥ आणिक पाचारीं गंधर्व येथें ॥
त्यांसी पाठवूनि महीवरतें ॥ मेळा करा सर्वाहीं ॥१००॥
नाना बैरागी संन्यासी ॥ जपी तपी संतयोगियांसी ॥ येथें आणोनि समाजेंसीं ॥ अन्नदानें उत्साह करावा ॥१॥
सुरवरगंधर्वगणसहित ॥ देवदानवकिन्नरांसहित ॥
मेळवोनि अपरिमित ॥ आनंद उत्साह करावा ॥२॥
ऐसें सांगतांचि चित्रसेनातें ॥ मग चित्रसेनें पाचारी गंधर्वातें ॥
एकशत गंधर्व महीवरते ॥ प्रकट झाले येवोनी ॥३॥
मग त्या गंधर्वासी चित्रसेने ॥ सांगूनि सर्व वर्तमान ॥
दाही दिशा प्रेरणा करुन ॥ प्रज्ञावंत आणिले कीं ॥४॥
जपी तपी योगशीळ ॥ गुप्त प्रगट आणिले सकळ ॥
नवनाथादि ऋषिमंडळ ॥ येऊनियां पोहोंचले ॥५॥
शुक दत्तात्रेय याज्ञवल्की ॥ वसिष्ठ वामदेव कपिल शेखी ॥
व्यास पाराशर नारद ऋषी ॥ वाल्मीक पाचारिले गंधर्वी ॥६॥
अठ्यायशीं सहस्त्र ऋषिभार ॥ स्वर्गीहूनि उतरले देवकिन्नर ॥
गणगंधर्वदि वसुलोक अपार ॥ तपोलोक पातले ॥७॥
त्यांतचि अष्टवसूंपहित ॥ उपरिचर आला विमानव्यक्त ॥
तेणें येतांचि मच्छिंद्रास वृत्तांत ॥ कीलोतळेचा सांगीतला ॥८॥
कीं सोडूनि स्त्रीदेश अवनी ॥ सिंहलद्वीपा गेला मैनाकिनी ॥
परी तुमच्या वियोगेंकरुनी ॥ क्षीणशरीर झालीसे ॥९॥
तरी असो कैसें ते ॥ भेटेल तुम्हां ईश्वरसत्ते ॥
परी योगक्षेम स्वशरीरातें ॥ आहांत कीं त्रिवर्ग ॥११०॥
मच्छिंद्र म्हणे अहो जी ताता ॥ तव कृपेची दृष्टी असतां ॥
सदा मिरवूं सर्व क्षेमता ॥ पदोपदी अर्थातें ॥११॥
ऐसे वदतां उभय जाण ॥ तों देवांसह उतरला पाकशासन ॥
ब्रह्मा विष्णु रुद्रादि पूर्ण ॥ महीलागीं उतरले ॥१२॥
श्रीनाथासी भेटोनि सकळ ॥ मग ठाई ठाई सर्व मंडळ ॥
विराजूनि वार्ता सकळ ॥ ठाई ठाई करिताती ॥१३॥
येरीकडे गोरक्षनाथें ॥ पाचारुनि मच्छिंद्रातें ॥
म्हणे समुदाय अपरिमित ॥ मिळाला कीं महाराजा ॥१४॥
तरी तुमची कनकवीट ॥ आणोनि देतों सुमट ॥
तितुक्यांत अर्थ सारोनि सुभट ॥ बोळवावें समस्तांतें ॥१५॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ काय करुं ही कनकवीट ॥
तुजएवढा शिष्यवर्गात ॥ असतां चिंता नसे मज ॥१६॥
ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ ॥ गदगदां हांसे गोरक्षसुत ॥
म्हणे महाराजा प्रतापवंत ॥ सकळ तुम्ही प्रगटलां ॥१७॥
ऐसें बोलोनि वागुत्तरीं ॥ माथा ठेवी चरणांवरी ॥
म्हणे महाराजा स्वशरीरीं ॥ स्वस्थ आपण असावें ॥१८॥
अष्टसिद्धी अणिमा गरिमा ॥ प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा ॥
वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा ॥ सिद्धीलागीं पाचारा ॥१९॥
पाचारिल्या अष्ट जणी ॥ येवोनि लागल्या गोरक्षचरणीं ॥
म्हणती आज्ञा करा स्वामी ॥ कामनेसह अर्थातें ॥१२०॥
येरु म्हणे वो प्रियभामिनी ॥ तृप्त करावें मंडळीलागुनी ॥
षड्रसान्नरुचीकरोनी ॥ संतुष्ट सर्व करावे ॥२१॥
मग तेथ अवश्य म्हणोनि सिद्धी ॥ वेंचित्या झाल्या आपुल्या बुद्धी ॥
अन्न निर्मिले पर्वतमांदी ॥ षड्रसादि पक्कान्नें ॥२२॥
ऐशा सिद्धी योजिल्या कामा ॥ याचपरी सडासंमार्जक्न आराम ॥
सप्तही सटव्या नेमूनि उत्तमा ॥ मही पवित्र करीतसे ॥२३॥
तरी त्या सप्तही सटव्या कोण ॥ ऐका तयांचीं नामाभिधानें ॥
आणि तयांतें काय कामानें ॥ निरोपिलें विधीनें ॥२४॥
तरी त्या उत्पत्तिस्थानीं जन्मकाळा ॥ जावोनि लक्षावें यांनीं बाळा ॥
विधिअक्षरें लिहिलीं भाळा ॥ वाचूनि पाहती सटव्या ॥२५॥
जरी सप्त सटव्या मानवासी ॥ शोभा न मिरवे असुरप्रदेशीं ॥
रानसटवी वनचरांसी ॥ विलोकूनि जातस्वे ॥२६॥
वृषभ अश्व गांवाचे पशू ॥ घोडसटवी आहे त्यांस ॥
वासतसटवी खेचरांत ॥ पक्षिकुळा मिरवतसे ॥२७॥
अंबुघासटवी जळचरांत ॥ सबुधासटवी उदळी जात ॥
ऐसिया कामीं सटव्या सात ॥ कमलोदभवें लाविल्या ॥२८॥
त्या सातही परिचारिका ॥ सडासंमार्जन करिती निका ॥
यापरी वाढणें आनंदोदिका ॥ जळदेवता आराधिल्या ॥२९॥
कुमारी धनदा नंदा विमला ॥ लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञानमंगळा ॥
नववीं समर्थं देवता बाळा ॥ ह्या नवही वाढिती सकळातें ॥१३०॥
गंधर्वे करावें पाचारणें ॥ समाचार घ्यावा अष्टवसूनें ॥
चौकी द्यावी भैरवानें ॥ अष्टदिशा अष्टांनी ॥३१॥
उपरिचरवसूनें करपल्लवी ॥ सकळांसी दक्षणा द्यावीं ॥
मच्छिंद्र करीत आघवी ॥ प्रदक्षिणा भावार्थे ॥३२॥
चित्रसेन गंधर्वपती ॥ तांबूल देतसे सर्वांप्रती ॥
आणि तीर्थ जे गंगाभगीरथी ॥ तोय वाढी सर्वांतें ॥३३॥
यापरी अष्टोत्तरशत तीर्थे ॥ पाणी वाहती समर्थे ॥
आणि उचलणें उच्छिष्टपात्रातें ॥ ऐशीं कामे करिताती ॥३४॥
महानुभाव जो उमापती ॥ अती आदरें स्वपंक्तीं ॥
अप्सरा किन्नर गायन करिती ॥ नारदादि येवोनियां ॥३५॥
ऐसें नेम नेमूनियां कामा ॥ दिधलें ऐसें कार्य उगमा ॥
आनंदोत्साह होतां सुकर्मा ॥ सर्वानंद हेलावें ॥३६॥
ऐसी होतां आनंदस्थिती ॥ परी गाहिनी आठवला गोरक्षचित्तीं ॥
मग येवोनियां मच्छिंद्राप्रती ॥ बोलता झाला प्राज्ञिक ॥३७॥
हे महाराजा गुरुनाथा ॥ प्राणिमात्र आले समर्था ॥
परी कर्दमपुतळा गाहिनीनाथा ॥ येथें आणावा वाटतें ॥३८॥
ऐसें मोहक ऐकोनि वचन ॥ म्हणें गंधर्वा पाठवोन ॥
कोंतिगेसहित मधुब्राह्मण ॥ बाळासह आणावा ॥३९॥
मग चित्रसेना सांगोनि वृत्तांत ॥ पत्र लिहिलें मधुविप्राते ॥
सुलोचन गंधर्वाचे ओपून हस्तें ॥ कनकगिरीशीं पाठविला ॥१४०॥
गंधर्व जावोनि कनकगिरीसी ॥ भेटोनि कोंगिगे मधुविप्रासी ॥
मग आनंदोत्सव वृत्तांतासी ॥ निवेदिलें सकळ तेथे ॥४१॥
मग पत्र देवोनि त्याहातीं ॥ वाचून पाहे विप्रमूर्ती ॥
पाचारण ही मजकुरशक्ति ॥ ध्यानालागीं संचरली ॥४२॥
मग बाळासह सपरिवार ॥ येता झाला मधुविप्र ॥
मुक्कामोमुक्काम महीवर ॥ साधुनिया पोंचला ॥४३॥
सप्तवर्षी गहिनीनाथा ॥ आणूनि लोटिला पदवरुता ॥
मच्छिंद्र अंकीं घेवोनि त्यांतें ॥ प्रेमें चुंबन घेतसे ॥४४॥
अति स्नेहानें करोनि लालन ॥ म्हणे अवतारी करभंजन ॥
गैबी जन्मला गहिनीनाम ॥ सकळालागीं दिठावी ॥४५॥
ऐसिये स्नेहाचा परम अवसर ॥ पाहोनि बोलता झाला शंकर ॥
कीं आम्हालागीं पुढें अवतार ॥ घेणें आहे मच्छिंद्रा ॥४६॥
तरी त्या अवतरणीं नेमस्ती ॥ मही मिरवे नामांप्रती ॥
तरी त्या अनुग्रहाचे स्थितीं ॥ गहिनीनाथ वदविला ॥४७॥
तरी त्यातें विद्या अभ्यासून ॥ सकळ अधिकारी करावा पूर्ण ॥
मी अनुग्रह याचा घेईन ॥ पुढले ते अवतारीं ॥४८॥
ऐसें सांगतां शिव त्यास ॥ मग बोलावूनि गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास ॥
गोरक्षानें देवविला ॥४९॥
सर्व देवांचे साक्षीसहित ॥ मौळीं ठेविला वरदहस्त ॥ ब्रह्मपरायण गहिनीनाथ ॥
जाहला सत्य परियेसा ॥१५०॥
अनुग्रहउत्साह मंडळीसंगम ॥ एक मास उभवला आनंदद्रुम ॥
मग कुबेरा पाचारुनि नेम ॥ सांगता झाला गोरक्ष ॥५१॥
म्हणे हा कनकगिरी जा घेवोन ॥ अम्हां देई अपार भूषण ॥
सकळ मंडळी गौरवोन ॥ पाठवणें स्वस्थाना ॥५२॥
मग तो कुबेर बोलें वचन ॥ येथेंचि असों द्यावें धन ॥
मी लागेल तैसें इच्छेसमान ॥ भूषणातें आणितों ॥५३॥
मग अपार दिंडें वस्त्रें आणोन ॥ महत्त्वासारखें दिधलें वांटोन ॥
द्रव्यादि दैवोनि याचकजन ॥ तोषविले सकळ ॥५४॥
सकळ तोषले पावोनि मान ॥ पावती आपुलें स्वस्थान ॥
परी मच्छिंद्र तेथें राहोन ॥ अभ्यासिती गहिनीतें ॥५५॥
उपरी गंधर्व मच्छिंद्रपिता ॥ तो आपुले स्वस्थाना जातां ॥
त्यासवें देऊनि मीननाथा ॥ सिंहलद्वीपीं पाठविला ॥५६॥
उपरिचर वसूनें मीननाथ ॥ केला कीलोतळाच्या हस्तगत ॥
मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत ॥ निवेदिला तियेसी ॥५७॥
कीलोतळेंनें ऐकोनि वृत्तांत ॥ नेत्रीं आणिलें अश्रुपात ॥
म्हणे आतां मातें मच्छिंद्रनाथ ॥ कैसा भेटेल कळेना ॥५८॥
उपरिचर बोले वो शुभाननी ॥ चिंता न करीं कांहीं मनीं ॥
एक वेळां मच्छिंद्रमुनी ॥ निजदृष्टीं पाहसील ॥५९॥
ऐसें म्हणोनि उपरिचर गेला ॥ येरीकडे कीलोतळा ॥
हदयीं कवळोनि मीननाथबाळा ॥ प्रेमें चुंबन घेतसे ॥१६०॥
म्हणे बाळा माझिये खंती ॥ होतसे कीं तुजप्रतीं ॥
सोडोनि आलासी नाथ निगुती ॥ श्री मच्छिंद्र पितयातें ॥६१॥
ऐसें बेलोनि मीननाथातें ॥ वारंवार चुंबन घेत ॥
येरीकडे गर्भाद्रातें ॥ गहिनी विद्या अभ्यासी ॥६२॥
तये वेळेस कोण कोण तेथें ॥ राहिलें होते ऐका नाथ ॥
विचार करोनि उमाकांत ॥ गर्भाद्रातें राहिले ॥६३॥
अदृश्य अस्त्र नगीं प्रेरुन ॥ स्वस्थाना गेला कुबेर निघोन ॥
तेणें नग तो कनकवर्ण ॥ झांकोळून पैं गेला ॥६४॥
परी गर्भाद्रि पर्वतांत ॥ वस्तीस राहिला उमाकांत ॥
तो अद्यापि आहे स्वस्थानांत ॥ म्हातारदेव म्हणती त्या ॥६५॥
तयाचिया पश्चिम दिशेसी ॥ कानिफा राहिला शिष्यकटकेंसी ॥
वस्ती करोनि नाम या ग्रामासी ॥ मढी ऐसें ठेविलें ॥६६॥
तयाचे दक्षिण पर्वतीं ॥ राहता झाला मच्छिंद्र जती ॥
त्याहूनि पूर्वेस महीपर्वतीं ॥ जालिंदर राहिला ॥६७॥
आणि त्या पर्वतापैलदेशीं ॥ नागनाथ राहिला वडवानळेंशीं ॥
आणि रेवणासिद्ध जया महाशीं ॥ विटेग्रामीं राहिला ॥६८॥
वामतीर्थ गर्भाद्रिपर्वतीं ॥ राहता झाला गोरक्ष जती ॥
सेवेसी शिष्य ठेवोनि सप्ती ॥ विद्या सागे गाहिनीते ॥६९॥
एक वर्षपर्यंत ॥ अभ्यासिला गाहिनीनाथ ॥
सकळ विद्येचे स्वसामर्थ्य ॥ तया देहीं सांठविलें ॥१७०॥
परी कोंतीगांवी मधुब्राह्मण ॥ गेले होते गहिनीस ठेवोन ॥
ते जालंदरासमीप दिशेकारण ॥ वस्तीलागीं विराजले ॥७१॥
विराजले परी गहिनीनाथ ॥ अभ्यासिते झाले पात्रभरित ॥
मग गोरक्ष बोळवोनि त्यातें ॥ विप्रापाशीं पाठविला ॥७२॥
यावरी त्या वस्तीस ॥ वसते झाले बहुत दिवस ॥
शके दहाशें वर्षांस ॥ समाधीं त्यांनी घेतल्या ॥७३॥
घेतल्या परी यवनधर्म ॥ कबरव्यक्त झाले आश्रम ॥
पुढें औरंगजेब तें पाहून ॥ पुसता झाला लोकांसी ॥७४॥
ह्या कोणाच्या असती कबरी ॥ ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारीं ॥
मठींत कान्हाबापर्वती मच्छिंद्र ॥ आवडतें स्थान याचें तें ॥७५॥
त्याहूनि पूर्वेस जालिंदर ॥ विराजली त्याची कबर ॥
त्याहूनि खालता बल्ली थोर ॥ गाहिनीनाथ नांदतसे ॥७६॥
मग तेणें ऐकूनि ऐसी भात ॥ पालटिलें त्या नांवातें ॥
जानपीर जालिंदरातें ॥ ठेविलें असे राजानें ॥७७॥
गाहिनीनाथास गैवी पीर ॥ नाम ठेविलें तेवी साचार ॥
महीजदी बांधोनि पुजारे ॥ ठाई ठाई स्थापिले ॥७८॥
मच्छिंद्र आणि कानिफाचें ॥ नामाभिधान बदलूनि साचें ॥
मायावा कान्होबा बोलोनि साचें ॥ यवन पुजारी स्थापिले ॥७९॥
कल्याण कलबुगीं बाबाचैतन्य ॥ राजबागशर नाम ठेविलें त्यानें ॥
म्हणाल केलें यवनकारण ॥ ऐसें विपरीत त्या रायें ॥१८०॥
परी समाधी पाहिल्या कबरीऐशा ॥ म्हणोनि त्यातें पडला भास ॥
कीं हे पीर असतील यवनकुळींचे ॥ म्हणोनि प्रविष्ट करावें ॥८१॥
म्हणोनि ऐसें कृत्य घडलें ॥ यापरी ऐकोनि श्रोता बोले ॥
कीं कबरयुक्त नाथ केले भले ॥ काय म्हणोनि झालेती ॥८२॥
तरी ते अंतरसाक्ष नाथ ॥ यवन राजे होतील महीते ॥
ते छळितील हिंदूदेवांतें ॥ म्हणोनि कबरी बांधिल्या ॥८३॥
परी हें असो आतां कथन ॥ मध्यें कथा असती देदीप्यमान ॥
नाथांनीं योजूनि आपुलालें स्थान ॥ ठाई ठाई राहिले ॥८४॥
गोरक्ष सटव्या ठेवोनि रक्षण ॥ निघता झाला तीर्थांकारण ॥
त्या सटव्या तेथें अद्याप राहून ॥ रक्षिताती स्थानासी ॥८५॥
यापरी पुढें गोरक्षनाथ ॥ भेटेल जाऊनि भर्तरीस ॥
ती कथा पुढें रसाळभरित ॥ श्रोतिये श्रवणीं स्वीकारा ॥८६॥
नरहरिवंशीं धुंडीकुमर ॥ कवि मालू असे संतकिकर ॥
कथा सांगेल भक्तिसार ॥ भर्तरीचे आख्यान ॥८७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥
सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयोविंशाध्याय गोड हा ॥१८८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय २३ ॥ ओव्या ॥१८८॥
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें