सोमवार, 23 नवंबर 2009

सदगुरू || श्री गुरूदेव दत्त || चरणाची विनंम्र भावयुक्त अंतकरणपूर्वक प्रार्थना

गुलाब पुष्पासम गौर कांती || आजानुबाहु अशी दिव्य मुर्ति ||
कृपापूर्ण ती नेत्रदीप्ती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || १ ||
प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतीचे || जे रूप श्रीपाद श्री वल्लभाचे ||
अवधूत मुर्ति अवतार झाला || नमो सदगुरू दत्त स्वामी पदाला || २ ||
जयाच्या पुढें काळ ही नम्र आहे || अशा स्वामीच्या मी पदी बाळ आहे ||
समर्था तुझें पोर ना दीन व्हावे || चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे || ३ ||
अनन्य भावे घडे स्वामी भक्ति || करिती तयां संतही साह्य प्रीती ||
ग्रहांची नसे त्या प्रतिकुल भीती || कुलदेवता ही अनुकुल होती || ४ ||
पदी भक्त आले कृपा पात्र झाले || बहु सिद्ध केले किती उद्धरीले ||
असामान्य तुमची असें किर्तीगाथा || म्हणोनीच हा ठेविला पायी माथा || ५ ||
असे पात्र स्वामी मी तुमच्या कृपेसी || नको सोडू माते तरी या मुलासी
मला संपदाही तुझे पाय दोन्ही || तुझ्याविण माझे जगी नाही कोणी || ६ ||
फळाली कृपा संत देवादिकांची || मिळाली मला जोड स्वामी पदांची ||
हृदयी ठेव जीवा धरी घट्ट पाय || तया सारखी न करी कोणी माया || ७ ||
मातेची माया पित्याचीच छाया || दया मुर्तिच्या या नको सोडू पाया ||
मना भार ठेवी अरे याच ठाया || मिळेना कुठे ही अशी स्वामी माया || ८ ||
सदा स्वामी सन्नीध ऐसे करावे || तुम्ही साह्यकारी मनीं हे ठसावे ||
जाज्वल्य तुमचा अभिमान राहो || भयाचा मला लेश न स्पर्श होवो || ९ ||
समर्थ जाणोनी आलो मी पाया || तुम्हीच माझे सर्वस्व व्हाया ||
कृपेचे जरी अल्प देशी निधान || जीवा सारीखे मी तयासी जपेन || १० ||
पदी हट्ट ऐसा धरीला असें मी || ध्यानी दिसावे मला याच जन्मी ||
मी स्वामीचा स्वामी सर्वस्व माझे || असें प्रेम वाढो गुरूमाय तुझे || ११ ||
मला स्वामी राजा तुमचीच छाया || तुम्हाविण देवा करी कोण माया ||
स्वामी समर्थ गर्जूनी गावे || या जीवनाचा महायज्ञ होवो || १२ ||
आधार नाही तुम्हां विण कोणी || नसे आश्रदाता तुम्हा विण कोणी ||
माता पिता सदगुरू एक स्वामी || जवळी मला घ्या करी प्रार्थना मी || १३ ||
स्वामी करावे इतुके करावे || हाती धरावे मला ना त्यजावे ||
होईन मीं पात्र तुमच्या कृपेने || अशा तळमळीवीण मी कांहीं नेणे || १४ ||
प्रभो मी न माझा तुमचाच होवो || त्वदिच्छे प्रमाणे ही वृत्ती रावो ||
असे हो कृपाळा तुम्हां वाहिलो मी || चरणारविंदार्पणमस्तु स्वामी || १५ ||
|| श्री गुरूदेव दत्त ||

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें